Friday 13 December 2019

चिकित्सा न केल्यानेच बहुजन समाज बौद्धिक गुलामगिरीत-डॉ.आ.ह.साळुंखे

गोंदिया,दि.12ः धार्मिक ग्रंथ व ऋषीमुनींनी सांगिलेल्या बाबी ह्याच अंतिम सत्य, असे आपण मानत राहिलो. कारण येथे माणसाला चिकित्सा करण्याचा अधिकार नव्हता. म्हणूनच आपल्या पूर्वजांना अज्ञान व गरिबीच्या गर्तेत शेकडो वर्षे घालवावी लागली. जोपर्यंत धर्म व परंपरेची चिकित्सा होणार नाही; तोपर्यंत बौद्धिक गुलामगिरीच्या तुरुंगातून बहुजन समाजाची सुटका होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यीक डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केले.येथील संथागारात बोलण्याची संधी मिळणे हे माझ्या आयुष्यातील अच्युत्त आनंदाचे क्षण आहे.येथील ग्रंथालयाला धम्मपालाचे दिलेले नाव हे सुध्दा महत्वाचे असून जगभर विचार पोचविण्यासाठी धम्मपालांने केलेल्या कार्याचा उल्लेख करीत त्यांच्या नावाने असलेले ग्रंथालयात थांबण्याचा आनंदही वेगळाच असल्याची भावना व्यक्त केली.
येथील संथागार सभागृहात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज गुरुवारला(दि.12) ‘विवेक जागर’ या कार्यक्रमांतर्गत डॉ.आ.ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रभाकर गजभिये, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अर्जुन जाधव, संजय शेंडे,विमा राहुलकर,ओबीसी संघर्ष कृती समिती महिलाध्यक्ष पुष्पा खोटेले,सविंधान मैत्री संघाच्या प्रमिला सिंद्रामे,सयोंजक उमेश उदापूरे उपस्थित होते.यावेळी संथागार,ओबीसी संघर्ष कृती समिती,सविंधान मैत्रीसंघासह अनेक सामाजिक संघटनाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ.आ.ह.साळुंखे पुढे म्हणाले की,राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवण्याचे काम सध्या सुरू आहे.त्यालाही उत्तर देण्यासाठी दुसरीकडे आपलीही मुले प्रबोधनातून तयार होत आहेत.प्रत्येकाचे वेगळेपण असून निसर्गाने मानवाला दुहेरी भूमिका दिली आहे.७०० कोटी लोक जगात असून त्यापैकी कुणासोबतही आपल्या हाताते ठसे जुळत नाही, तेवढे वेगळेपण दिले आहे.माणूस हा एकटा जगू शकत नाही, एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय जगूही शकत नाही.झुंडीला विवेक नसतो उदिष्ठ नसतो अशा परिस्थितीत आपण विवेक नसलेल्या भावी पिढीच्या हातात समाज दिला तर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.एकमेकात ऐक्य नसल्याने विदेशी आक्रमणात आपला समाज पराभूत झाला हा इतिहास आहे.त्यामुळे एैक्य टिकवून ठेवण्यासाठी सविंधान महत्वपुर्ण आहे.परंतु सध्या सविंधानाचेच रक्षण करण्याची वेळ आली असून जोपर्यंत आपण सविंधानाचे रक्षण करणार नाही.तोपर्यंत स्वातंत्र्य जपण्यासाठी आपल्याला किमंत मोजावी लागणार असल्याचे म्हणाले.
गौतम बुद्धाने व्यक्ती म्हणून स्वत:ला अलिप्त केले होते. त्यांनी ‘बुद्धं सरणं गच्छामी’ असे सांगितले. म्हणजे ‘मी ज्ञानी माणसाला शरण जातो’ असा त्याचा अर्थ होतो. महात्मा बसवेश्वरांनीही ‘हा आमचा हा आमचा’ असा बंधुत्वाचा संदेश दिला. केवळ ज्ञान आणि एखाद्या विचाराच्या मुळाशी जाण्याच्या लालसेनेच चीनमधील बौद्ध भिक्खू हयूएन त्संग याने हाल अपेष्टा सहन करीत, लांब प्रवास करीत भारताचा दौरा केला. जोपर्यंत आपण ज्ञानावरची निष्ठा जपणार नाही;तोपर्यंत पर्यायी संस्कृती उभी करता येणार नाही, असे डॉ.साळुंखे म्हणाले.
३-४ हजार वर्षे बहुजनांना कसलाही अधिकार नव्हता. त्यामुळे आमच्या पूर्वजांना अंधकारमय आयुष्य  जगावं लागले. आता यातून डोकं मुक्त करण्याची वेळ आली आहे. धर्म, परंपरेची चिकित्सा केल्याशिवाय बहुजनांची बौद्धिक तुरुंगातून मुक्तता होणार नाही. चिकित्सा केल्यामुळेच युरोपची प्रगती झाली. अरिस्टॉटलचा सिद्धांत गॅलिलिओने खोडून काढला, धर्मग्रंथांनी सांगितलेला सिद्धांत कोपरनिकसने खोटा ठरवीत पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असे सांगिते आणि कोपरनिकसच्या पुढे जाऊन ‘पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरते’ असं केपलरने सांगितले, असे डॉ.साळुंखे यांनी स्पष्ट केले. चार्वाकाने माणूस हा विवेक व बुद्धी यामुळे वेगळा आहे. त्यामुळे धर्मग्रंथांनी सांगितलेले स्वीकारणार नाही. स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे, असं सांगितले.शंकेचे निराकरण करने,प्रश्न विचारणे हा गुन्हा समजला जात असे परंतु त्यापुढे जाऊन गौतम बुद्धाने इतरांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे सांगितले आणि हीच गोष्ट बहुजनांसाठी क्रांतिकारक ठरत आहे, असे डॉ.आ.ह.साळुंखे यांनी विविध दाखले देत स्पष्ट केले.सोबतच चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला तर बदनामी,छळ केला जातो.मारण्याचेही प्रयत्न केले जातात,न्याय चिकित्सेमुळे वाढत जाते.चिकित्सा जपायची की नाही हे समाजाला ठरवावे लागणार आहे.गैरवाजवी अतिक्रमण स्विकारणार नाही आणि दुसर्यावरही होऊ देणार नाही, हे जपले तर स्वातंत्र्य व अभिव्यक्ती जपले जाऊ शकते असेही सांगतानाच मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका तर ती पुरुषापेक्षाही कर्तबगार होऊ शकते हे अडीचहजार वर्षापुर्वीच गौतम बुध्दांनी सांगितल्याचे डाॅ.साळुंखे म्हणाले.

डॉ.साळुंखे यांनी सावित्रीबाई फुले ह्या भारतीय स्त्री जीवनातील मोठा अपवाद असल्याचे सांगून त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टांमुळेच आजच्या महिलांची प्रगती झाल्याचे प्रतिपादन केले. अलिकडेच झालेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतातील बहुसंख्य तरुणांकडे नव्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य नसेल. त्यामुळे २०३० पर्यंत या तरुणांची अवस्था अत्यंत बिकट झालेली असेल. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य टिकवायचे असेल, तर भावी पिढीला कोणता विचार देणार आहोत, याचा गंभीरपणे विचार व्हावा, असे ठाम मत डॉ.साळुंखे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्रा.अर्जुन जाधव यांनी हा व्यक्तीचा सत्कार करत नसून विचारांचा सत्कार आहे.हा विचारांचा पाया हजाराेवर्षापासून रुजलेला असून त्या विचारांना पोचविण्याचे काम गेल्या ४० वर्षापासून आ.ह.साळुंखे सातत्याने करीत आहेत.ते वारकरी संप्रदायाचे असून संंस्कृतभाषेत रुची असल्याने त्यात सखोल अभ्यास करून लेखण केले.संस्कृत भाषेतील अभ्यासानंतर धर्मग्रंथात समाजाबद्दल काय लिहिले आहे आणि काय सांगितले जाते हे सत्य काय हे पटवून देण्याचे काम सुरू केले.विश्वकोष तयार करण्याच्या कार्यात त्यांना संधी मिळाली असून १०० हून अधिक लेख विश्वकोषात लिहिल्याचे सांगितले तसेच  ५५ पुस्तके प्रकाशीत झाली आहेत असे सांगितले.यावेळी प्रभाकर गजभिये यांनी अध्यक्षीय भाषणात १४ आक्टोबंर १९५६ च्या धम्मक्रांतीमुळे आज आम्ही याठिकाणी एकत्र येऊ शकलो.अभिव्यक्ती स्वातंत्र्यता आता कुठे राहिली सविंधानाने दिलेले हक्क अधिकार हिसकावले जात आहेत.त्यामुळे सर्वांना संघटित होण्याची वेळ आल्याचे म्हणाले.
याप्रसंगी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ.आ.ह.साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी केले.कार्यक्रमाला डी.डी.मेश्राम,सुनिल तरोणे,क्रांती ब्राम्हणकर,विजय बहेकार,अतुल सतदेवे,उमेश उदापूरे,रोशन मडामे,बबलू कटरे,प्रा.बी.एम.करमकर,खेमेंद्र कटरे,सविता बेदरकर,प्रा.प्रकाश धोटे,सावन कटरे, रमेश ब्राम्हणकर,कैलास भेलावे,लखनसिंह कटरे,डाॅ.संजिव रहांगडाले,माणिक गेडाम,युवराज गंगाराम,काशिराम हुकरे,के.बी.चव्हाण,प्रा.नामदेवराव किरसान,गुरुदास येडेवार,हरिष ब्राम्हणकर,लिलाधर गिहेपुंजे,वैशाली खोब्रागडे यांच्यासह मराठा सेवा संघ, ओबिसी सेवा संघ, संविधान मैत्री संघ, बुद्धीस्ट समाज संघ, संभाजी ब्रिगेड, नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, जिजाऊ ब्रिगेड, युवा बहुजन मंच, ओबिसी संघर्ष कृती समिति, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति, अवंतीबाई लोधी महासभा या आयोजन समितीच्या संघटनेचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...