Tuesday 17 December 2019

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी १८ डिसेंबरला गडचिरोली दौऱ्यावर

गडचिरोली,दि.१७: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बुधवारी १८ डिसेंबरला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी सकाळी १०.१५ वाजता श्री.कोश्यारी यांच्या हस्ते अहेरी येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत्‍ महिला बचत गटांद्वारे संचालित उडाण सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे निर्मित सोलर प्लेट व बल्ब निर्मितीच्या उद्योगाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ते अहेरी येथील एकलव्य निवासी विद्यालयाला भेट देतील. त्यानंतर श्री.कोश्यारी हे गडचिरोलीला येणार असून, दुपारी १ वाजता येथील महिला व बाल रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. शिवाय नियोजन भवनात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करुन नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.
अहेरी येथील कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ.रामदास आंबटकर, प्रा.अनिल सोले, आ.धर्मरावबाबा आत्राम, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, पंचायत समिती सभापती सुरेखा अलाम, विशेष अतिथी म्हणून राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त संजीवकुमार, राज्यपालांचे उपसचिव रणजितकुमार, जीवनोन्नती अभियानाच्या सीईओ श्रीमती आर.विमला, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.विजय राठोड, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रधान संचालक राहुल गुप्ता उपस्थित राहणार आहेत.
असा आहे राज्यपालांचा दौरा
बुधवारी १८ डिसेंबरला सकाळी ९.१० वाजता राज्यपाल कोश्यारी हे नागपुरातून हेलिकॉप्टरने अहेरीकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात पोहचल्यानंतर १०.१५ वाजता ‘उडाण’ प्रकल्पाला भेट देऊन तेथील महिला बचत गटांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते एकलव्य निवासी विद्यालयाला भेट देतील. १२.१० वाजता राज्यपाल कोश्यारी हे अहेरी येथून निघून दुपारी १२.४५ वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे पोहचतील. दुपारी १ ते १.२० या कालावधीत राज्यपाल हे गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर पाऊण तास सर्किट हाऊस येथे थांबतील व २.२० ते ३.१० या कालावधीत ते नियोजन भवन येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करुन नागरिकांशीही संवाद साधतील.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...