Thursday 8 March 2018

स्त्री आरोग्य आणि आहार....


जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख…








घरातील सगळ्यांची काळजी घेणारी, परंतु स्वत:कडे दुर्लक्ष करणारी. घरातील प्रत्येकाची आवड निवड जपणारी, परंतू स्वत:ची आवड निवड विसरणारी. सगळ्यांना वेळेवर जेवण करण्यासाठी शिस्त लावणारी, परंतू स्वत:च्या जेवण्याच्या वेळा न पाळणारी. सर्वांसाठी ताजे चमचमीत पदार्थ बनविणारी, परंतू स्वत: शिळे अन्न संपविणारी. मुलांचे शिक्षण, नोकरी, घरातील वडीलधाऱ्यांची काळजी, आजारपण यांची सेवा करणारी, परंतू स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य न देणारी अशी स्त्री प्रत्येकाच्या घरात नक्कीच असते. मग ती आई, मुलगी, बहीण वा पत्नी कुणीही असू शकते. मग या स्त्रीची आपण नको कां काळजी घ्यायला हवी. घरातील कामे करतांना तिला भरपूर आरोग्यविषयक समस्या असतात. परंतू जेव्हा हया समस्या तिच्या पेलविण्यापलीकडे जातात तेव्हा ती डॉक्टरांकडे जाते. जेव्हा ती आजारी पडते तेव्हाच तिचे महत्व कुटूंबाला कळते.
स्त्रीला प्रजननापासून ते मोनोपॉझपर्यंत भरपूर समस्या असतात. स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडे व सांध्याचे विकार (ऑस्टीओपोरोसीस व संधीवात), कॅन्सर (स्तन व गर्भाशयाच्या), रक्ताल्पता, थॉयरॉईड असे विविध आजार तसेच मानसिक तणाव, डिप्रेशन स्त्रीयांमध्ये आढळून येतात. याचे कारण म्हणजे पोषणयुक्त पदार्थाचे सेवन न करणे, अतिमेदयुक्त व कार्बोदकेयुक्त आहाराचे सेवन, अतिप्रमाणात चहा-कॉफीचे सेवन, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनपध्दती, मानसिक ताणतणाव, गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर.
किशोरावस्थेपासून स्त्रीमध्ये बदल व्हावयास सुरुवात होते. जसजसे वय वाढते तसतसे शरीरात विविध शारिरीक आणि हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे त्यांना अत्याधिक पोषक आहाराची गरज असते. मासिक पाळी, गर्भावस्था, स्तनदा माता व मेनोपॉझ या काळात रक्तक्षय, कमजोर हाडे, ऑस्टीओपोरोसीसचा जास्तीत जास्त धोका असतो. त्यामुळे या काळात स्त्रीयांनी लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जीवनसत्वे ड व बी-९ फोलेटचे आहारात सेवन वाढवावे. कॅल्शियम, लोह, प्रथिने, फॉलीक ॲसिडची या काळात गरज वाढलेली असते.
कॅल्शियम हाडे व दाताकरीता आवश्यक असते. तसेच हृदयाची गती व नर्वस सिस्टीमचे कार्य योग्यरित्या करण्याकरीता आवश्यक असते. कॅल्शियमच्या अभावाने मुड बदलणे, चिडचिडेपणा, घाबरेपणा, तणाव आणि झोप न येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. शरिराला पुरेसे कॅल्शियम न मिळाल्यास शरीर पेशीचे कार्य योग्यप्रकारे सुरु राहण्याकरीता आपल्या हाडातून व दातातून ते ओढून घेते. यामुळे हाडे खडूसारखी ठिसूळ पडले की लगेच फ्रॅक्चर होते. याकरीता आहारात दूध, दही, दुधाचे पदार्थ, पनीर, हिरव्या भाज्या, नाचणी, सुकामेवा, अंडी, खसखस, तीळ, राजमा, राजगीरा, पदीना, कडीपत्ता, बदाम, सोयाबीन, गाजराची/शेवग्याची पाने यासारख्या पदार्थाचे सेवन करावे. कॅल्शियमच्या शोषणासाठी जीवनसत्वे डी ची गरज असते. म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे, अंडी, मासे, झिंगे, दुधाचे पदार्थ खावे. यामुळे संधीवातापासून रक्षण होते. कॅल्शियमच्या अवशोषणाकरीता मॅग्नेशियमची गरज असते. हिरव्या भाज्या, काकडी, बिया, हिरव्या शेंगा, ब्रोकोली यातून मॅग्नेशियम मिळते. रक्तात ऑक्सिजनचे वहन करण्याकरीता हिमोग्लोबीनची आवश्यकता असते व हिमोग्लोबीन तयार करण्याकरीता लोहाची गरज असते. मासिक पाळी, गर्भावस्था, स्तनदा माता व मेनोपॉझ या काळात भरपूर रक्तस्त्राव होतो व त्यामुळे रक्तक्षय होतो व रोग प्रतिकारशक्ती कमी होते. नेहमी थकलेले, दम लागणे, लक्ष्य केंद्रीत न होणे, मुडीपणा, चिडचिडेपणा, घाबरटपणा, तणाव असे लक्षणे आढळतात. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोह, यामध्ये गर्द हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, पेनखजूर, गुळ, शेंगदाणे, फुलगोबी, मुळ्याची पाने, शेपू, अळीव, बीट, गाजर, ज्वारी, बाजरी, डाळी, सोयाबीन, सुकामेवा, मासे, मटन याचा आहारात समावेश करावा. लोहच्या शोषणासाठी विटॅमीन-सी ची गरज असते. याकरीता आंबट फळे, निंबू, संत्री, आवळ्याचे रोजच्या आहारात सेवन करावे.
गर्भामध्ये जन्मजात दोषाचे प्रमाण कमी करण्यास, हृदयरोग व काही प्रकारच्या कॅन्सरपासून दूर ठेवण्यास, रक्ताभिसरण व मेंदूचे कार्य उत्तम राहण्याकरीता विटॅमीन बी-१२ व बी-९ फॉलीक ॲसिडची गरज असते. याच्या कमतरतेमुळे त्वचा फिक्की होते, कमजोरी, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, घबराहट यासारखे त्रास होतात. यामुळे आहारात हिरव्या भाज्या, अंडी, मटन, मासे, दुधाचे पदार्थ, फळे, सुकामेवा, शेंगा, तृणधान्य आहारात समावेश करावा. अशाप्रकारे स्त्रियांनी समतोल आहाराचे सेवन करुन स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवावे.स्वस्थ स्त्री, स्वस्थ कुटूंब. स्वस्थ कुटूंब, स्वस्थ देश.
– शिल्पा आंबेकर 
आहारतज्ञ, केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय,गोंदिया

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...