Tuesday, 25 December 2018

माओवाद्यांच्या संपर्कातील वैज्ञानिकास बाघनदी परिसरात अटक

गडचिरोली,दि.25(विशेष प्रतिनिधी) :माओवाद्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात असलेल्या हैदराबाद येथील वैज्ञानिकास पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. नक्का वेंकटराव असे अटक केलेल्या वैज्ञानिकाचे नाव असून तो हैदराबाद येथे केंद्र सरकारच्या एका विभागात कार्यरत आहे. छत्तीसगड पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली असून महाराष्ट्र पोलिसही आता या वैज्ञानिकाला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाच राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांनी आता नक्का वेंकटराववर लक्ष केंद्रीत केले आहे.
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याची सीमा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यालगत आहे. या भागात रविवारी बाघनदी परिसरात माओवाद्याचा एक मोठा नेता येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला होता. मोटरसायकलवरुन आलेल्या या नेत्याला सीमेत प्रवेश करताच पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो सुशिक्षित असून केंद्र सरकारच्या हैदराबाद येथील एका रिसर्च संस्थेत वैज्ञानिक पदावर कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. नक्का वेंकटराव हा मुळचा आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या कुत्तपेठ येथील रहिवासी आहे. त्याला छत्तीसगड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माओवादी विचारांशी जुळलेली कागदपत्रे तसेच दोन मोबाइल आणि २३ डिटोनेटर त्याच्याकडे सापडले. वेंकटराव उर्फ मूर्ती हा विस्फोटकांचा तज्ज्ञ असल्याने दंडकारण्यात विस्फोटके पुरवण्यासह प्रशिक्षणातही त्याने भाग घेतल्याचा संशय आहे. तसेच संघटनेसाठी लागणाऱ्या मोठा शस्त्रसाठ्यासह आर्थिक रसद पुरवण्यातही वेंकटरावने भूमिका बजावल्याचा संशय आहे. छत्तीसगड पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काही धक्कादायक तपशील त्याने मान्य केल्याचे सुरक्षा यंत्रणेमधील एका जबाबादार पदाधिकाऱ्याने  सांगितले. उत्तर गडचिरोली गोंदियासह बालाघाटपर्यंत सक्रिय असलेल्या माओवाद्याच्या एका केंद्रीय समितीच्या सदस्यासोबत २०१६ मध्ये कौरुवात तसेच २०१७मध्ये बागरझोलाच्या जंगलात दोन बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. नुकतेच मोठा माओवादी नेता पहाडसिंगने दुर्ग पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यावेळीच नक्का वेंकटराव चळवळीतील सहभागाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्ंयाना मिळाली. त्यानंतर वेंकटरावच्या या भागातील दौऱ्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. दरम्यान, वेंकटरावच्या अटकेची माहिती मिळताच गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यानी एक पथक चौकशीसाठी दुर्गला रवाना केले आहे. पूर्व विदर्भातल्या माओवादी कारवाया, संघटनेचा विस्तार यात वेंकटरावच्या भूमिकेचा तपास केला जाणार असल्याचे अंकुश शिंदे यानी सांगितले. वेंकटरावच्या अटकेवर पुणे पोलिसांनीही लक्ष केंद्रीत केले आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या उपायुक्त सुहास बावचे यांनी छत्तीसगड पोलिसाशी संपर्क साधला. तसेच नक्का वेंकटरावचा लहान भाऊ नारायण राव हा तेलंगणा सिव्हील लिबर्टीज या संघटनेचा महासचिव असल्याची माहितीही पुढे आली आहे.
–कोण आहे नक्का वेंकटराव
नक्का वेंकटराव हा १९८० ते ८५ या काळात शिकत असताना पीपल्स वार ग्रुपची विद्यार्थी संघटना असलेल्या रेडिकल स्टुडंट युनियनच्या संपर्कात आला. नक्का वेंकटरावला त्याच्या शैक्षणिक पात्रतेमुळे केंद्र सरकारच्या जियोफिजिकल रिसर्च इस्टिट्युटच्या हैदराबाद येथील विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ या वैज्ञानिक पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्याला सध्या दीड लाख रुपये पगार असून त्याची पत्नी हेमललिता ही आंध्रप्रदेशात वकील आहे. ती उपकार नावाची एक खासगी संघटना चालवित असल्याची माहिती पुढे आली आहे.’पीपल्स वॉर ग्रुप’ या माओवादी संघटनेच्या विस्तारासह सध्याच्या माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी वेंकटरावने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भूमिका बजावल्याची माहिती आहे. माओवाद्याच्या केंद्रीय नेतृत्वासह अनेक केंद्रीय समितीच्या संपर्कात वेंकटराव होता. संघटनेत वेंकटरावला मूर्ती हे नाव आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...