Thursday, 27 December 2018

मतदान यंत्राबाबत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा-जिल्हाधिकारी लक्षीनारायण मिश्रा

वाशिमदि२६ : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत साशंकता आणि  संभ्रम आहे. त्यांच्या शंका आणि संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत नव्यानेच वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन या दोन्हीच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके दाखवून आणि याबाबत योग्य माहिती देवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
२६ डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेतील पथकांसाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी मिश्रा बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश्वर हांडे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, जनजागृती मोहिमेसाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांनी गावकऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके सादर करतांना ग्रामस्थांच्या शंकांचे समाधान करावे. जनजागृती मोहिमेची पूर्व कल्पना ग्रामस्थांना व्हावी, यासाठी दवंडी देण्यात यावी. तसेच पूर्वप्रसिद्धी करण्यात यावी. कोणताही मतदार या मोहिमेदरम्यान प्रात्यक्षिकापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या गावामध्ये सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व अन्य लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना याबाबतची पूर्व कल्पना द्यावी. ज्यामुळे ते सुद्धा या मोहिमेदरम्यान आपल्या गावात प्रात्यक्षिके सादर करतांना उपस्थित राहतील व त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात येईल. ज्या गावामध्ये बाजार असेल अशा ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्याठिकाणी देखील सभागृहात किंवा शेडमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके दाखवावीत.
जनजागृती मोहिमेदरम्यान ज्या पथकांना जी वाहने देण्यात आली आहेत, त्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा असली पाहिजे. कोणत्या मार्गाने हे वाहन जात आहे व सद्यस्थितीस कोणत्या गावात आहे, याची माहिती देखील उपलब्ध होईल. प्रत्येक दिवशी पथकाने प्रात्यक्षिकाचा एक व्हिडीओ पाठवावा. मतदारांमध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाहीत, याची दक्षता घेवून त्यांच्या शंकाचे निराकरण करण्यासोबतच अभ्यासपूर्ण माहिती ग्रामस्थांना द्यावी, असेही श्री. मिश्रा म्हणाले.
श्री. हांडे म्हणाले, जनजागृती मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराला मतदान कसे करायचे, याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखवावे. व्हीव्हीपॅट या यंत्रामुळे आपण कोणाला मतदान केले आहे, हे मतदाराला व्हीव्हीपॅट यंत्राच्या माध्यमातून दिसणार आहे. एक ईव्हीएम व एक व्हीव्हीपॅट संच प्रात्यक्षिकाच्यावेळी काही बिघाड झाल्यास राखीव राहणार आहे. जनजागृती मोहिमेदरम्यान पथकासोबत पोलीस देखील तैनात राहणार आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. जनविश्वास पथकाने आपला जनतेमध्ये विश्वास प्रात्यक्षिकादरम्यान निर्माण करून त्यांच्या शंकांचे समाधान करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ही जनजागृती मोहीम जिल्ह्यातील एकूण १०४३ मतदान केंद्रात राबविण्यात येणार आहे. यासाठी ७ पथके गठीत करण्यात आली असून एका पथकामध्ये पाच कर्मचारी राहणार असून मंडळ अधिकारी हे पथक प्रमुख म्हणून असतील. प्रत्येक पथकासोबत एक सुरक्षा रक्षक देखील असणार आहे. ही मोहीम जवळपास ४० ते ४५ दिवस जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. कार्यशाळेला सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह पथकप्रमुख व पथकातील सदस्य उपस्थित होते. कार्यशाळेनंतर जनजागृती पथकांच्या वाहनाला जिल्हाधिकारी मिश्रा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही पथके जनजागृती मोहिमेसाठी रवाना झाली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...