Saturday 22 December 2018

आर्ची-परश्याने जिंकली गोंदियावासींची मने



- सीएम चषक स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा थाटात

गोंदिया, २२ - 'सैराट' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील चित्रपट रसिकांच्या मनावर राज करणाऱ्या सैराटफेम रिंकू राजगूरू (आर्ची) व आकाश ठोसर (परश्या) या दोघांनी पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्यातील प्रेक्षकांची मने जिंकली. जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी २१ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी येथील पंचायत समितीसमोरील पटांगणावर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा व सिएम चषक क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दोघा कलावंतांनी हजेरी लावून विजयी स्पर्धकांना बक्षिस वितरण केले. 
या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले,  भाजपा महामंत्री विरेंद्र अंजनकर, श्रीमती शारदा बडोले, माजी जिप उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती एकनाथ हत्तीमारे, सभापती अरविंद शिवणकर, भाजपा तालुकाध्यक्ष विजय बिसेन, लक्ष्मण भगत, माजी जिप सभापती उमाकांत ढेंगे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी सभापती कविता रंगारी, संदीप कापगते, उपसभापती राजेश कठाणे व  जिप सदस्य शीला चौहान, माधुरी पातोळे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाने, सर्व पंस सदस्य व पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 
राज्यातील ग्रामीण भागातील युवकांमध्ये खेळ भावना निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा व त्यांचातील खिलाडूवृत्ती वाढावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात सीएम चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, दौड, बुद्धिबळ,कॅरम आदी खेळांच्या समावेश आहे. जिल्ह्यातही भाजयुमोच्या माध्यमातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार अर्जुनी मोरगाव विधानसभा येथे देखील सीएम चषक क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. .या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारे सैराटफेम परश्या व आर्ची यांनी आपली हजेरी लावली होती. 
दरम्यान, आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये प्रतिभा असून या स्पर्धांच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करा. तसेच ना. बडोले यांचे कौतूक करत असे नेतृत्व सर्वांनाच लाभावे, असे मत यावेळी आकाश ठोसर यांनी व्यक्त केले. तर कष्ट केल्याशिवाय काहीही मिळणार नसल्याचे रिंकू राजगूरू यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. यावेळी बोलताना ना. बडोले म्यांहणाले की, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कौशल्य दडलेले असून चांगले प्रतिभावंत खेळाडू व कलावंत असून या खेळाडूंच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी सीएम चषक हे एक प्रभावी माध्यम ठरले. या प्रसंगी ना. बडोले यांच्या आग्रहावर सैराट चित्रपटातील ‘मराठीत सांगितलेल कळत नाही होय इंग्लिशमध्ये सांगू काय, हे डायलॉगही आर्चीने बोलून दाखविले. यावेळी अर्जुनी-मोर विधान सभा क्षेत्रातील कलावंतांसाठी गायन व नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीएम चषकाच्या विविध खेळातील विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...