Saturday 22 December 2018

मिलिंगच्या तांदळाचा ट्रक सीडब्लूसीने पाठविला परत

गोंदिया,दि.22-जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदीकरण्याकरीता आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आजपर्यंत लाखो क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून त्या धानाचे मिलिंग करुन तांदूळ  सेंट्रल वेयर हाऊसच्या गोदामात राईस मिर्लसच्या वतीने पाठविण्यास सुरवात झाले आहे. गेल्या एक आठवड्यापासून ही प्रकिया सुरु झाली असून १९ डिसेंबरला एमएच ३५-के ३५९ व एमएच ३५-१५९५ या वाहनातून ५४० क्विंटल तांदूळ गोंदियाच्या सेंट्रल वेयर हाऊसच्या गोदामात जमा करण्याकरीता नेण्यात आले असता त्या वाहनाची आवकमध्ये नोंद करण्यात आली.परंतु, त्या ट्रकमधील तांदूळ गोदामात जमा न करता परत पाठवण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. सेंट्रलवेयर हाऊसच्या अधिकाऱ्यांनी येथील राईस मिलर्स असो.च्या दबावात तो ट्रक पाठविल्याची चर्चा बाजारात सुरु झाली आहे. येथील राईस मिलर्स अशोसिएशन ही मोठी संस्था असून सीडब्लूसीच्या गोदामात एकप्रकारे यांचा दबदबा असल्याचे बोलले जाते.येथील अधिकारीही त्यांच्याच दबावात काम करीत असल्याची चर्चा आहे.
आलेला तांदुळ जमा न करता परत का पाठविण्यात आले, याचे मात्र समाधानकारक उत्तर सेंट्रल वेयर हाऊसचे अधिकारी देऊ शकले नाही. विशेष म्हणजे जिल्ह्यात यावर्षी धानाचे पीक चांगले झाले असून शासकीय धान खरेदी केंद्रावरही मोठयाप्रमाणात धानाची खरेदी झालेली आहे. गेल्या आक्टोंबरपासूनच धान केंद्रावर असतानाही धानाची उचल मात्र उशीरा करण्यात आली, जेव्हा की खरेदीच्या एक महिन्यानंतर धानाची उचल संबधित राईस मिलर्सला करायचे असते. जिल्हा मार्केंटिग विभागाच्यावतीने सुरु केलेल्या केंद्रावर आजपर्यंत २० हजार २५६ शेतकऱ्यांनी ६ लाख ३१ हजार ९६८.५९ क्विंटल धान ११० .५९ कोटी रुपयाचे खरेदी केले आहे.तर आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने १० हजार ६१७ शेतकऱ्यांचे ३ लाख १० हजार ८०६.८० क्विंटल धान खरेदी करण्यात आले असून ५४ कोटी ३९ लाख रुपये किमत आहे.१६४ कोटी ९८ लाख रुपयाच्या खरेदी केलेल्या धानापैकी १२५ कोटी ९७ लाख रुपयाचा चुकारा शेतकऱ्यांना करण्यात आलेला आहे. हा खरेदी केलेला धान जिल्ह्यातील १४० राईस मिलर्सना मिलिंग करीता देण्यात आले आहे. त्यापैकी ज्या राईस मिलर्सनी धानाची उचल केली त्यांनी मिलिंग करुन तयार झालेला तांदूळ सेंट्रल वेयर हाऊसच्या गोदामात पोचविण्यासही सुरवात केली आहे. मिलिंगपासून तयार झालेला तांदूळ ठेवण्यासाठी जिल्ह्यात ७ गोदामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये सेट्रल वेयर हाऊस गोंदिया, एमआयडीसी, महाराष्ट्र सेंट्रल वेयर हाऊस आमगाव, शासकीय गोदाम देवरी, नवेगावबांध, सौंदड व गोरेगाव येथील गोदामाचां समावेश आहे. या गोदामात तांदूळ वेळेवर स्विकारला गेला नाही तर केंद्रावरील धानाची उचल होणार नाही आणि धान खरेदी केंद्रातील गोदामाची क्षमता पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
सीडब्लूसीच्या गोदामात तांदूळ रिकामे करण्यासाठी आलेले ट्रक परत का गेले याबाबत सेंट्रल वेयर हाऊसचे व्यवस्थापक सुमित वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रक तांदूळ घेऊन आलेले होते. आपण त्यादिवशी नागपूरला होतो. मात्र ते ट्रक का परत गेले याबाबत माहित नसल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...