Saturday 22 December 2018

वायफाय सुविधेचा उपयोग ज्ञानवर्धनासाठी करा - ना. सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर, दि.21 - कोणताही देश किती धनसंपन्‍न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्‍न आहे यावर त्‍या देशाच्‍या प्रगतीचे मुल्‍यमापन केले जाते. त्‍यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्‍या सेवेत रूजु होणा-या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्‍या बेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्‍यासाठी करण्‍याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्रीमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा शहर आणि तालुक्‍याच्‍या विकासाची प्रक्रिया यापेक्षाही अधिक गतीमान करण्‍यासाठी मला आपल्‍या सर्वांच्‍या सहकार्याची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले.

21 डिसेंबर रोजी पोंभुर्णा शहरात नविन बस स्‍थानक बांधकामाचा भूमीपूजन सोहळा तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पण या कार्यक्रमांच्‍या निमीत्‍ताने आयोजित जाहीर सभेत वित्तमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, नगराध्‍यक्षा श्‍वेता बनकर, उपाध्‍यक्षा रजिया कुरैशी, पंचायत समितीचे उपसभापती विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्‍य ज्‍योती बुरांडे, गंगाधर मडावी, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी विपिन मुद्दा, तहसिलदार अशोक तरोडे, राज्‍य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक राहूल मोडक, वास्‍तु विशारद किशोर चिद्दलवार आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वित्तमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा शहर व तालुक्‍यातील नागरिकांच्‍या सोईच्‍या दृष्‍टीने सर्व सोयींनी युक्‍त असे बस स्‍थानक निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी माझ्याकडे केली. ज्‍या तालुक्‍यातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्‍या नागरिकांची मागणी मी प्राधान्‍याने पूर्ण केली व आज बस स्‍थानकाच्‍या बांधकामाचे भूमीपूजन करताना अतिशय आनंद होत आहे. एस.टी. महामंडळाला 700 नविन बसेस खरेदीसाठी जेव्‍हा मी मान्‍यता दिली. त्‍यावेळी त्‍यांना 200 बसेस चंद्रपूर जिल्‍हयासाठी देण्‍याबाबत सुचना मी दिल्‍या. पोंभुर्णा शहर व तालुक्‍यात विविध विकास कामे आम्‍ही पूर्णत्‍वास नेली आहेत. शहरात डॉ.श्‍यामप्रसाद मुखर्जी वाचनालय लवकरच जनतेच्‍या सेवेत रूजु होत आहे. स्‍मशानभूमी, कब्रस्‍तान, आठवडी बाजार यांची कामे प्रगतीपथावर आहेत. तलावाच्‍या सौंदर्यीकरणाचे काम सुध्‍दा लवकरच सुरू होणार असून इतरही विकासकामे प्राधान्‍याने पूर्णत्‍वास येत आहेत. बिव्‍हीजीच्‍या मदतीने 5000 एकरवर शेतीत नवनविन प्रयोग करण्‍याचे प्रस्‍तावित असून यासाठी विख्‍यात उद्योजक रतन टाटा यांचा मी आभारी आहे. पोंभुर्णा तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी कुक्‍कटपालन योजनेच्‍या माध्यमातुन रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या असून घोंगडी क्‍लस्‍टरला मान्‍यता दिली आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्‍य, कृषी विकास, रस्‍ते विकास, पाणी पुरवठा, विद्युत व्‍यवस्‍था या सर्वच घटकांवर विशेष लक्ष्‍य केंद्रीय करून पोंभुर्णा शहर व तालुक्‍याचा विकास करण्‍यासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याचे ते यावेळी बोलताना महणाले.
यावेळी नविन बसस्‍थानक बांधकामाचे भूमीपूजन तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पण वित्तमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.शंभरकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...