Tuesday 25 December 2018

देशाला हिंदू राष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज : कन्हैय्या कुमार

नागपूर,दि.24ः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर या देशात सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नसती. ब्राह्मण आणि दलित एकाच बेंचवर बसून शिकू शकले नसते, ही या देशातील संविधानाची ताकद आहे. आज केवळ संविधानच नव्हे तर या देशातील जवान आणि शेतकरीही धोक्यात आहे. त्यांना वाचवण्याची गरज आहे. देशाला हिंदूराष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज आहे. त्यामुळे ही लढाई पक्ष-विपक्ष अशी नाही. तर मोदी विरुद्ध भारतातील लोकं अशी असून व्हॉट्सअ‍ॅपचा जितका वापर करता, तितकाच आपल्या बुद्धीचाही वापर करा, आणि एकजूट होऊन प्रबुद्ध भारत घडवा, असे आवाहन युवा नेता कन्हैय्याकुमार याने केले.
बहुजन विचार मंचतर्फे रविवारी मानकापूर स्पोर्ट्स स्टेडियम येथे ‘मेरी शक्ती-मेरा संविधान’ हा संविधान जागर असलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर होते. तसेच काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी महापौर अटलबहादूर सिंग प्रमुख अतिथी होते. यावेळी डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘संविधान निष्ठांनो एकत्र या’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कन्हैय्याकुमारने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकरावर चौफेर टीका केली. तो म्हणाला, सध्या गाय मातेच्या नावावर राजकारण सुरु आहे. खुर्चीचा धंदा चालवला आहे. या देशातील निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक यासारख्या संस्थांना नेस्तनाबूत केले जात आहे. स्कील इंडियाच्या नावावर कील इंडिया सुरु आहे. पूर्वी राजकीय पक्ष हे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर चालत होते. परंतु आता ते न्यूज अँकरच्या भरवशावर चालत आहे. या देशातील मुख्य प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही त्याने यावेळी केली.कन्हैय्याने खास शैलीत थेट मोदी-शहांवर हल्ला चढविला. ‘पैसे देऊन वोट खरेदी करतात, नंतर हजारो कोटी घेऊन नीरव मोदी पळून जातो. राजकारणाचा हा गेम सेट आहे. जनतासुद्धा मूकदर्शक बनून बघते आहे. उद्योगपतींसाठी सरकारने लाखो कोटींची मागणी आरबीआयकडे केली. यामुळेच आरबीआय प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला,” असे म्हणाला.नोटबंदीतून तीन लाख कोटी रुपये पुढे आल्याचा दावा मोदी करतात, मग मेट्रोसह अन्य योजनांसाठी विदेशातून पैसा का आणावा लागतो, असा प्रश्‍नही त्याने उपस्थित केला.

कन्हैय्या कुमार याने यावेळी आरएसएसला हिंदूइझमवर चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले. तो म्हणाला, भगवा रंग हे वीरतेचे प्रतीक आहे, कायरतेचे नव्हे. हा रंग दुसऱ्यांना वाचवण्याचा आहे, मारण्याचा नाही. हा रंग शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बुद्धाचा रंग आहे. रामाच्या नावावर राजकारण केले जात आहे.नागपूर  ही आरएसएसची संघभूमी नव्हे तर आंबेडकरांची दीक्षाभूमी होय, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, की यानंतरची लढाई ही धर्म आणि संविधान अशीच होणार आहे. त्यासाठी संविधाननिष्ठांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.
नितीन राऊत म्हणाले, ते हुंकार रॅली काढत असतील तर आम्ही संविधान जागर करून या देशातील युवकांना जागृत करू. आ. जितेंद्र आव्हाड यांनीही मोदी सरकारवर टीका करीत या देशात सर्व काही बदलू शकते पण संविधान नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसचे महापालिकेचे गटनेते प्रफुल्ल गुडधे यांनी प्रास्ताविक व भूमिका विषद केली. संचालन प्रा. अनमोल शेंडे यांनी केले. नरेश जिचकार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...