Saturday 19 May 2018

येदियुरप्पा: कर्नाटकातील औटघटकेचे मुख्यमंत्री


बेंगळुरू,दि.19(वृत्तसंस्था)ः- कर्नाटक विधानसभेत आम्ही ‘शत-प्रतिशत’ बहुमत सिद्ध करू, असा दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा बहुमत चाचणीआधीच राजीनामा देतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत होती. ही शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे. ‘आम्हाला जनतेने 104 जागा दिल्या. 113 जागा मिळाल्या असत्या, तर आम्ही हे राज्य सुजलाम सुफलाम केले असते’, अशा शब्दांत भावना व्यक्त करून भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी विधानसभेत भावूक भाषण केले,आम्हाला जनतेने कौल दिला. मात्र आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे, असे म्हणत येडियुरप्पा यांनी विधानसभेत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यामुळे येडियुरप्पा केवळ औटघटकेचे मुख्यमंत्री ठरले. 


बहुमताचा आकडा गाठण्यात आपण अपयशी ठरल्याची जाणीव झाल्यानंतर, बहुमत चाचणीत नापास होऊन नामुष्की ओढवून घेण्यापेक्षा आधीच राजीनामा देऊ, असे येडियुरप्पांनी भाजपाश्रेष्ठींना कळवले होते. कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाताच, येडियुरप्पा भाषणासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी भावनिक भाषणं केले. ‘जनतेने काँग्रेस आणि जेडीएसला नाकारत भाजपाला कौल दिला. मात्र आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक आमदारांचे पाठबळ नाही,’ असे ते म्हणाले. भविष्यात सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टीने, चाचणीआधीची ही माघार त्यांना फायदेशीर ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
कर्नाटक विधानसभेत ११२ ही ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्यांनी जंग जंग पछाडले. काँग्रेस-जेडीएस-बसपा एकत्र आल्याने १०४ वरून ११२ पर्यंत मजल मारणे सोपे नव्हते, पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते. काँग्रेस-जेडीएसच्या लिंगायत आमदारांवर त्यांची मदार होती. राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिल्यानं ते तसे निर्धास्त होते. पण, अचानक सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धक्का दिला आणि त्यांची सगळीच गणितं बिघडली.
काँग्रेस म्हणाली- येदियुरप्पांनी 15 कोटी, मंत्रीपदाची ऑफर दिली
– काँग्रेस नेते व्ही.एस. उग्रप्पा म्हणाले, भाजपच्या बी.वाय विजेंद्र यांनी काँग्रेस आमदारांच्या पत्नीला फोन करुन सांगितले की तुमच्या पतीला सांगा, येदियुरप्पांच्या बाजूने मतदान करा. आम्ही तुमच्या पतीला मंत्रीपद किंवा 15 कोटी रुपये दिले जातील.
– याआधी काँग्रेस नेते वीरप्पा मोईली म्हणाले, भाजपला माहित आहे की त्यांच्याकडे 104 आमदार आहेत. त्यानंतरही त्यांनी शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले, आमच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी हवेते देण्याचाही पेशकश केली गेली. मात्र आमचे आमदार आमच्यासोबत आहेत.

येदियुरप्प यांच्या मुलावर दोन आमदारांचा डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या दोन्ही आमदारांना बाहेर काढण्यात आले आहे . येदियुरप्पांची एक ऑडिओक्लिप जारी करुन ते आमदारांच्या पत्नीशी बोलत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. त्याआधी काँग्रेसला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. प्रोटेम स्पीकर (हंगामी अध्यक्ष) केजी बोपय्या यांच्या नियुक्तीला काँग्रेसने आव्हान दिले होते. ती याचिका रद्द करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी झाली. बोपय्या हेच हंगामी अध्यक्ष असतील असे कोर्टाने सांगितले आहे. त्याच बरोबर बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण आणि सभागृहात चोख बंदोबस्त राहिल असेही निर्देष सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...