Monday, 21 May 2018

देवरी न.पं.चा अध्यक्ष येत्या शुक्रवारी ठरणार



राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता

देवरी,दि.२१- येत्या शुक्रवारी (दि.२५) होऊ घातलेल्या देवरी नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी आज एकूण चार नामांकन दाखल करण्यात आले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, निवर्तमान अध्यक्ष सुमन बिसेन ह्या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या निवडणुकीला रंग येणार असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांत आहे.
 आज अध्यक्षपदासाठी नामांकन भरण्याच्या दिवशी एकूण चार अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यमान नगराध्यक्ष सुमन बिसेन, दविंदर कौर भाटिया आणि माया निर्वाण तर भाजप तर्फे कौशल्या कुंभरे यांचा समावेश आहे. सभागृहातील बलाबल बघितले असता, राष्ट्रवादी आठ, भाजप सात, काँग्रेस एक आणि अपक्ष एक असे समीकरण आहे. मात्र, अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकाने भाजपला समर्थन दिल्याने राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सामना बरोबरीचा आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या हातात सत्तेच्या हुकमाचा एक्का होता. त्याही वेळी भाजप तर्फे कॉंग्रेसच्या नगरसेवकाला नाना प्रलोभने दाखविण्यात आली होती. मात्र, त्या सदस्याने पक्षादेशाचे उल्लंघन न केल्याने राष्ट्रवादीला सत्ता मिळवता आली. मात्र, यावेळी चित्र पालटल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या काही हुशार सदस्यांनी उपाध्यक्ष पदाचे गाजर दाखविल्याने राष्ट्रवादीच्या एका महत्त्वाकांक्षी सदस्याने सत्ताधारी पक्षातील सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात आहे. परिणामी, आजघडीला भाजपचे आठ आणि तो सदस्य भाजपच्या गळाला लागल्याने राष्ट्रवादीला ही निवडणूक जड जाण्याची चिन्हे दिसत आहेत. भरीस भर म्हणून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे तीन तीन नामांकन दाखल झाल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल भाई पटेल कशा पद्धतीने हाताळतात, यावर राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून आहे. राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या त्या सदस्याचे मन वळविणासाठी या क्षेत्राच्या आमदारांची मदत घेतल्या गेल्याची चर्चा शहरात आहेत. परिणामी, राष्ट्रवादी पक्षावर आपले सदस्य सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यास त्यांचे गंभीर परिणाम आगामी निवडणुकांवर पडण्याची दाट शक्यता राजकीय गोटात वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...