Tuesday 29 May 2018

शेतकऱ्याचे आमरण उपोषण तलावात !

नागपूर ,दि. २९ : लघुसिंचन विभागाच्या आसोली शिवारातील तलावाच्या दुरुस्तीला तत्काळ सुरुवात करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ताराचंद सलामे यांनी तलावाच्या मध्यभागी सोमवारपासून (दि. २८) आमरण उपोषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी तलावाच्या मध्यभागी मचाण बांधून सदर आंदोलन सुरू केले.
आसोली (ता. रामटेक) शिवारातील या तलावाची निर्मिती २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने केली होती. या काळात प्रशासनाने एकदाही या तलावाची दुरुस्ती केली नाही. एकूण ९० एकरात पसरलेल्या या तलावाची सिंचनक्षमता ७० एकर असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. वास्तवात, दुरुस्तीअभावी या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने एकीकडे पाणी साठवण क्षमता कमी झाली असून, दुसरीकडे सिंचनक्षमताही घटली आहे.
दरम्यान, ताराचंद सलामे यांनी पुढाकार घेत या तलावाच्या दुरुस्ती साफसफाईची मागणी करायल सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयात अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु, प्रशासनाने त्यांची ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. निधी उपलब्ध होत नसल्याने तलावाची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने प्रत्येकवेळी त्यांना लघुसिंचन विभागातील अधिकाऱ्यांकरवी सांगण्यात आले.
वारंवार मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात येता पूर्वसूचनेनुसार ताराचंद सलामे यांनी सोमवारपासून तलावाच्या मध्यभागी पाण्यात मचाण बांधून आंदोलनाला सुरुवात केली आहे.दरम्यान, उपोषणाला सुरुवात होताच तहसीलदार धर्मेश फुसाटे, लघुसिंचन विभागाचे सहायक अभियंता सलाम यांनी आंदोलनस्थळ गाठून ताराचंद सलामे यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाला निधी मागण्यात आला आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही या अधिकाऱ्यांनी सलामे यांनी केली. मात्र, जोपर्यंत शासन निधी मंजूर करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका सलामे यांनी घेतल्याने ही शिष्टाई फिसकटली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...