Saturday 2 November 2019

गंगाबाई रुग्णालयातील१० प्रसुतीतज्ञ डॉक्टरांचे राजीनामे




गोंदिया,दि.01 : महाराष्ट्रासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील सिमावर्ती भागाच्या गरोदर मातांकरिता हक्काचे आणि भरवशाचे समजण्यात येणारे बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आधीच विविध कारणांमुळे या रुग्णालयावर आरोपांच्या फैरी झाडण्यात येतात. अशात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या रुग्णालयात नियुक्त केलेल्या १० प्रसुतीतज्ञांनी राजिनामे दिल्यामुळे येथील रुग्णसेवा आज गुरुवारी(दि. १) पूर्णत: कोलमडली.
 बाई गंगाबाई रुग्णालयात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि काही उप जिल्हा रुग्णालयांतून महिला रुग्ण प्रसूतीकरिता येतात. हे रुग्णालय महिलांकरिता वरदान आहे. गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आल्यापासून हे रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला वर्ग करण्यात आले. त्यामुळे येथील प्रसूतीसह इतर विभागात वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर कार्यरत होते. या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यरत असलेल्या १० डॉक्टरांनी राजिनामे दिल्यामुळे आता रुग्णालयातील प्रसूती, बाह्य रुग्ण विभाग आणि शस्त्रक्रीया पूर्णपणे थांबल्या आहेत. आज गुरुवारी सकाळपासून विविध ठिकाणावरून येथे महिला प्रसूती आणि विविध उपचाराकरिता आल्या. मात्र रुग्णालयात आल्यानंतर येथील सेवा ठप्प पडल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागले. शासकीय रुग्णालय असताना देखील अनेक महिलांना तातडीने खासगी रुग्णालयांचा आसरा घ्यावा लागला. यात त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड सहन करण्याची वेळ आली. उल्लेखनीय म्हणजे या रुग्णालयात दिवसाला प्रसूतीकरिता ४० ते ४५ महिला येतात. त्यातील २० ते २५ महिलांची नॉर्मल, तर १२ ते १५ महिलांची सिझरद्वारे प्रसूती करण्यात येते. तसेच सुमारे दीडशे महिला विविध आजारांच्या औषधोपचाराकरिता येथे येतात. आता डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे काय करावे आणि काय नाही, अशी अवस्था रुग्णालय प्रशासनाची झाली.

प्रभारी अधिक्षकांनी सांभाळ‌ली ओपीडी

बाई गंगाबाई रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे आज सकाळपासून चांगलीच धांदल उडाली. विविध आजारांच्या महिला येथे उपचाराकरिता आल्या होत्या. त्या रुग्णांना परत पाठविण्याची वेळ आली होती. अशात बाई गंगाबाई रुग्णालयाच्या प्रभागी अधिक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी अर्धा दिवस रुग्णांची तपासणी केली. अन्यथा त्या रुग्णांना देखील आल्यापावली परत जावे लागले असते.

अधिष्ठाता म्हणतात नागपूरला पाठवा

एकीकडे डॉक्टरांचा अभाव, तर दुसरीकडे येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातलगांची आगपाखड असा दुहेरी मार येथील प्रशासनाला सहन करावा लागत आहे. यासंदर्भात बाई गंगाबाई रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी चर्चा केली असता प्रसूतीकरिता आलेल्या महिलांना नागपूरला पाठवा, असा सल्ला देवून मोकळे झाले. या रुग्णालयातील रुग्णसेवा केव्हा आणि कशी सुरळीत होईल, हे गुलदस्त्यात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...