यवतमाळ: परतीच्या अवकाळी पावसाने शेतातील नेस्तनाबूत झालेले पीक पाहून चिंताग्रस्त तरुण मुलाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. एका मुलीच्या लग्नाकरिता उसनवार घेतलेले कर्ज कसे फेडायचे?, दुसऱ्या विवाहयोग्य मुलीचे लग्न कसे करायचे?, शेतीकरिता घेतलेले कर्ज कसे फेडायचे?, संसाराचा पुढील गाडा कसा पेलायचा? अशा नानाविध प्रश्नाने मनात काहुर माजलेले आहे. अशा कठीण प्रसंगी मुख्यमंत्री भाऊ, माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या, अशी आर्त साद मागील वर्षी मुंबई येथे जाऊन देवेंद्र फडणवीसांना राखी बांधणा-या एका मुस्लिम बहिणीने घातली आहे.
अकोला बाजार येथील शेतकरी विधवा महिला फरजानाबी हुसेनखाॅ पठाण ( 62) यांना आठ मुली असून, एक तरुण मुलगा होता. त्यापैकी सात मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी सध्या विवाहयोग्य आहे. मागील उन्हाळ्यात एका मुलीचे लग्न झाले. त्या लग्नाकरिता घेतलेले खासगी कर्ज, शेताकरिता घेतलेले पीककर्ज आता कशाने फेडायचे अशी चिंता त्यांचा मुलगा अरबाजखाॅ हुसेनखाॅ पठाण याला भेडसावत होती. तो 31 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी शेतात गेला, एवढ्या कष्टाने उभे केलेले पीक परतीच्या अवकाळी पावसाने हातातून गेलेले पाहून त्याला ह्रदयाघात झाला आणि त्यात त्याचे निधन झाले. यंदा त्याचेही लग्न करायचे ठरले होते. एकुलता एक होतकरू मुलगा मरण पावल्यामुळे फरजानाबीचे कुटुंब पोरके झाले आहे. अवकाळी पावसाने शेतातील पीकही गेले, तरुण होतकरू मुलगाही जग सोडून गेला, त्यामुळे पुढील आयुष्य जगायचे कसे, मुलीचे लग्न कसे करायचे, कर्ज कसे फेडायचे असे नानाविध प्रश्न भेडसावत असताना फरजानाबींना अशा संकटकाळी भाऊ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आठवण आली. माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या व माझ्या कुटुंबाचे रक्षण करा म्हणत फरजानाबींनी देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे आर्त साद घातली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यासंबंधी कर्जमाफीसारखे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता जिल्ह्यातील दहा शेतकरी महिलांनी मुंबई येथे वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली होती. त्यामध्ये अकोला बाजार येथील रहिवासी फरजानाबी यांचा ही समावेश होता.
No comments:
Post a Comment