भंडारा,दि.21ः-मंत्रोच्चाराने पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा मांडण्यात आली. या पुजेसाठी पैशासह वन्यजीवांच्या अवशेषाचा वापर होत असल्याच्या संशयावरुन वन विभागाने धाड घालून सहा जणांना ताब्यात घेतले. परंतु, त्याठिकाणी ७४ हजारांच्या रोकड व पुजेच्या साहित्यांशिवाय वन्यजीवाचे कोणतेही अवशेष न सापडल्याने संशयितांकडून बंधपत्र लिहून सोडण्यात आले. हा प्रकार १८ नोव्हेंबर रोजी भंडारा तालुक्यातील नांदोरा येथे घडला.
१८ नोव्हेंबर रोजी नांदोरा येथील एका घरात काही व्यक्ती पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मंत्रोच्चार करुन त्यासाठी वन्यजीवांच्या अवशेषांचा उपयोग करणार असल्याची माहिती भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयाला प्राप्त झाली होती. या माहितीवरुन वन विभागाच्या पथकाने साध्या वेशात नांदोरा येथील घरावर धाड मारली. सदर घराच्या गेटला कुलूप लावून आत पूजा सुरू करण्यात आली होती. तथापि वन विभागाचे कर्मचार्यांनी घरात प्रवेश करुन त्यांचा पुजेचा प्रयत्न हाणून पाडला. त्याठिकाणी पुजेचे साहित्य, एका जनावराचे काळे केस व ७४ हजारांची रोकड आढळून आली. वन कर्मचार्यांनी वन्यजीवाचे अवशेष शोधण्यासाठी संपूर्ण घराची झडती घेतली. परंतु, एकही अवशेष त्यांना आढळून आला नाही. जे काळे केस त्यांना मिळाले ते वन्यप्राण्याचे नाहीत. ते दुसर्या एका प्राण्याचे असावेत, असा वन विभागाचा अंदाज आहे. दरम्यान या प्रकरणात वन विभागाने सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी वन विभागाने आणखी दोन दिवस चौकशी केली. परंतु, अवशेषाबाबत त्यांना एकही धागा सापडला नाही. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्यांना बंधपत्रावर लिहून सोडण्यात आले.
No comments:
Post a Comment