देवरीत दीपावली मिलन उत्साहात
देवरी, दि.5 - मला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी बरेच प्रयत्न केले. परंतु, सततच्या जनसंपर्कामुळे मतदारांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून मला विधानसभेत धाडले. लोकांचा माझ्यावर विश्वास असल्याने मी आमदार झालो. आमगाव विधानसभा मतदार संघातील शेतकरी, कामगार, युवक, बेरोजगार, महिला आणि आबालवृद्धांच्या अधिकारासाठी मी संघर्षरत राहीन. मी कोणतेही आश्वासन देणार नाही. मात्र, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्यांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आमगाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार यांनी देवरी येथे गेल्या रविवारी (दि.3) केले.
स्थानिक सीताराम लॉन्समध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने दीपावली मीलन कार्यक्रमात ते आपल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे हे होते. यावेळी ज्येष्ठ नेते टोलसिंह पवार, माजी मंत्री भरत बहेकार, राष्ट्रवादीचे नेते नरेश माहेश्वरी, शांतिलाल जैन, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहिवले, महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, शेखर कनोजिया, राधेशाम बगडीया, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसने, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम,अॅड. प्रशांत संगीडवार, ओमराज बहेकार,दीपक पवार, देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, माधुरी कुंभरे, सीमा कोरोटे, पारबता चांदेवार, प्रल्हाद भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कोरोटे म्हणाले की, विधानसभेची निवडणूक जिंकल्याने सर्वकाही साध्य झाले असे समजण्याचे काही कारण नाही. मेहनत ही करावीच लागणार आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. इच्छुकांनी आतापासून जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे सुखदुःख समजून घेत त्यांची कामे केली पाहिजे.अशाच लोकांचा पक्ष सुद्धा विचार करेल. काँग्रेस पक्षात प्रभावाने तिकिटे मिळण्याचे दिवस गेले. हे माझ्या उमेदवारीने कार्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे नरेश माहेश्वरी म्हणाले की, आघाडीचा विजय हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे. लढण्याची जिद्द कायम असली पाहिजे. सध्या देशातील वातावरणामुळे आमच्या कार्यकर्त्यांचे अनेक ठिकाणी प्रयत्न कमी पडले. मात्र, जनतेने आघाडीचे दिवस चांगले असल्याचे या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापसांत संघर्ष न करता एकजुटीने कार्य केल्यास आपल्याला चांगले दिवस बघावयास नक्की मिळतील, अशा आशावाद व्यक्त करीत आघाडी धर्माचे पालन अगदी ग्रामपंचायत स्तरावर कायम ठेवण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. भंडारा जि.प.चे माजी अध्यक्ष टोलसिंह पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी इतिहासापासून धडा घेतला पाहिजे. पक्षातील एका माजी आमदारामुळेच सहसराम कोरोटे सारखा दमदार आमदार या मतदार संघाला मिळाला. संघटन शक्ती ही कोणत्याही पक्षाच्या यशासाठी कारणीभूत असते. दुर्दैवाने त्या नेत्याला ते अद्यापही उमगले नाही. अहंकारामुळे त्या नेत्याने आपला घात केला, हे या निकालाने दाखवून दिले आहे. या मतदार संघात आतापर्यंत केवळ तीन आमदार झाले.कोणीही परत आमदार होऊ शकले नाही. त्यामुळे माजी आमदार महादेवराव शिवणकर यांच्या इतिहासाची पुनरावृत्ती करावयाची असेल तर कोरोटे यांनी जनतेत मिसळण्याची कला आत्मसात केली पाहिजे. जनतेला विसरणारा नेता विजयाची पुनरावृत्ती करू शकत नाही. श्री बहेकार यांनी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात मृतप्राय झालेली काँग्रेस ही आमदार कोरोटे यांच्या विजयाने पुनर्जिवीत झाली आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास या निवडणुकीपूर्वी बराच कमी झाला होता. असे नसते तर निकाल यापेक्षा अधिक चांगले आले असते. काँग्रेसला संपवू पाहणाèयांना जनतेने इशारा दिला आहे. दरम्यान, पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार कोरोटे यांचा सत्कार यावेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचलन अविनाश टेंभरे यांनी केले.उपस्थितांचे आभार माजी पंचायत समिती सभापती वसंत पुराम यांनी केले. या कार्यक्रमाला देवरी, आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment