Tuesday 12 November 2019

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.12 : विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. भाजपा, शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली होती. मात्र बहुमताचा आकडा नसल्याने दोन्ही पक्षांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेनं बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला संधी दिली. मात्र त्यांनाही बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. त्यांनीदेखील शिवसेनेप्रमाणेच मुदत वाढवून देण्याची विनंती केली. मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही.
राज्यात आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पहिल्यांदा १७ फेब्रुवारी १९८० मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी पवार समाजवादी काँग्रेस स्थापन करून पुलोद सरकारचे नेतृत्त्व करत होते. इंदिरा गांधींनी पवारांचे सरकार बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी जवळपास ११२ दिवस (१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती. पाच वर्षांपूर्वीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार होते. दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले होते. राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे सरकार अल्पमतात आले होते. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला. सरकारचा कालावधी संपत आल्याने विधानसभा बरखास्त करण्यात आली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ (३२ दिवस) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...