मृत गौतम फुलकुवरच्या वडिलांचा पत्रकार परिषदेत आरोप
मृत गौतम फुवकुवर |
देवरी,दि.18-देवरीपासून दक्षिणेला सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या कवलेवाडा येथील गौतम फुलकुवर आणि परमेश्वर खोबा यांच्यात क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाली. यात गौतमचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पुराव्यासह तक्रार देवूनही पोलिस आरोपीवर कारवाई करीत नसल्याचा आरोप मृताचे वडील रामभरोस फुलकुवर यांनी गेल्या गुरूवारी देवरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत (दि.15) केला.
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गौतम रामभरोस फुलकुवर (वय 30) आणि परमेश्वर हिरालाल खोबा हे दोन्ही नागपूरला कामाच्या शोधात गेले होते. परंतु, नागपूरात काम न मिळाल्याने 25 जुलैला ते देवरी येथे परत आले. संध्याकाळी सात त आठ वाजेच्या दरम्यान स्थानिक फुंडे हॉटेलमध्ये नाश्त्याच्या देवाण घेवाणीवरून त्यांच्या हाणामारी झाली.
फत्रकार परिषदेत बोलताना रामभरोस फुवकुवर आणि नातेवाईक |
यामध्ये गौतम हा बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर परमेश्वर याने आपल्या वडिलांना फोन करून देवरीस येण्यास सांगितले. दरम्यान, मृत गौतमचे वडील देखील रुग्णालयात आले. देवरी पोलिसांत तक्रार करावी लागेल, असे म्हणताच परमेश्वर आणि त्याच्या वडिलांनी मनाई करून गौतमच्या वडिलांनाच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे गौतमच्या वडिलांनी घाबरून मुलाला वाचविण्यासाठी गोंदियाला नेण्याची विनंती केली. विशेष म्हणजे गौतमवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा बघ्याचीच भूमिका घेतल्याचा आरोप सुद्धा गौतमच्या नातेवाइकांसह वडिलांनी केला आहे.
गौतमला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे जागा उपलब्ध नसल्याने त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान गौतमचा 30 जुलै रोजी मृत्यू झाला.. या सर्व घटनेचे साक्षीदार मनोज टेंभूर्णे, पवन देशमुख आणि भाऊराव वालदे हे असून या तिघांनी देवरी पोलिसांसमोर साक्ष दिली आहे. असे असताना सुद्धा देवरी पोलिस संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप रामभरोस फुलकुवर यांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर प्रकरणी नागपूर पोलिसांनी मर्ग दाखल केल्याची सूचना देवरी पोलिसांना प्राप्त झाली आहे. अद्याप शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मृत गौतम हा दारूच्या नशेत असल्याचा अहवाल वैद्यकीय सूत्रांनी दिला असून कोणतीही तक्रार नसल्याचे मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला लेखी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय नागपूर रुग्णालयातही कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे लेखी निवेदन दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही शवविच्छेदन अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत. चौकशी योग्य दिशेने सुरू असून कोणी दोषी आढळ्यास कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment