गोंदिया,दि.17:गेल्या चार पाच वर्षातील राजकारणाकडे बघितल्यास राजकारणात समाजकारण आणि विकासाचे व्हिजन संपलेले लोक आले असून आता पैसा, कंत्राटदारी आणि सत्ता या बळावर राजकारणी आपला फायदा करून घेऊ लागल्याने राजकारणाची दिशाच बदलत चालल्याने विकासासाठी मारक असल्याचे राष्ट्र वादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट करीत लोकसभेसारख्या निकालाची अपेक्षा सत्ताधार्यांनी करु नये परिवर्तन नक्की होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.पत्रपरिषदेला माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.
अलिकडे नेत्यांना विकासाची दुरदृष्टी नाही. पैसा, ठेकेदारी आणि सत्तेच्या भरोशावर राजकारण केले जात आहे. भावनात्मक प्रचार करून तात्कालीक फायदा करून घेतला जातो. समाजसेवा, चांगले काम करण्याची वृत्ती, क्षमता आणि दुरदृष्टी राजकीय नेत्यांमधून हरवत चालल्याचे दिसत आहे. हा प्रकार आता जनतेने समजून घेतला पाहिजे अन्यथा जिल्हा विकासापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही, असे खासदार पटेल म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार आहे. जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपा सरकारने ३७० कलम काश्मीरमधून हटविले. सुरूवातीला आम्ही त्यांच्या विरोधात नव्हतो. परंतु ज्यापद्धतीने त्यांनी काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून केंद्रशाशित प्रदेश केला. त्यामुळे आम्ही नाराज झालो. परिणामी आम्ही मतदानातही भाग घेतला नाही, असे त्यांनी सांगितले. बॅलेट पेपरवर मतदान व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. परंतु निवडणूक आयोग काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीने सकारात्मक भूमिका घेतल्यास त्यांनाही सोबत घेता येईल असे म्हणाले.
No comments:
Post a Comment