Tuesday, 20 August 2019

देवरी ग्रामीण रुग्णालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन


देवरी दि. 19 : देवरी हा तालुका राज्याच्या टोकावर आहे तसेच येथून राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गावर अपघात झाल्यास जखमीला तातडीने उपचार मिळाले पाहिजे. हा तालुका आदिवासी बहुल, दुर्गम व नक्षलग्रस्त असल्यामुळे या तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
19 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय देवरीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन डॉ. फुके यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार केशवराव मानकर, नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली, जि.प.समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोगंरे, पंचायत समिती सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके,प्रमोद संगीडवार, महेश जैन,  यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. फुके म्हणाले, देवरीसारख्या मागास, दुर्गम व नक्षलग्रस्त भागात चांगली आरोग्याची सुविधा देवरी येथे नव्याने निर्माण होणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत मिळणार आहे. इमारतीचे बांधकाम उत्तम दर्जाचे झाले पाहिजे. देवरी हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे यासाठी चांगले ट्रामा केअर सेंटर सुरु करावे. चांगला बगीचा या नवीन इमारतीच्या परिसरात तयार करावा. जुने झाडे तोडू नये. पाच वर्षात देवरी तालुक्यात विकास कामे झाली आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार पुराम म्हणाले, तालुक्यातील रुग्ण व नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी सुसज्ज अशी ग्रामीण रुग्णालयाची इमारत दिडवर्षाच्या आतच तयार होणार आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या देखील पाहिजे त्या प्रमाणात असली पाहिजे. हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळाले पाहिजे. जिल्हयात अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करतांना या नक्षलग्रस्त तालुक्यातील रिक्त पदे प्राधान्याने भरावे. देवरी शहराच्या विकासासाठी सतरा कोटीची विकास कामे मंजूर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीवर 12 कोटी 32 लाख 65 हजार रुपये खर्च येणार असून ही इमारत एक वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. याइमारतीमध्ये वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे निवासस्थाने, विविध कक्ष राहणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...