नवी दिल्ली,दि.12 - आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांमध्ये चीन फार पुढे गेला आहे. त्यामुळे आपण मंदिर, मशिदीच्या गोष्टीत अडकून पडलो तर केवळ वेळ फुकट जाईल. धर्म, जातपात विसरुन एक देश म्हणून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याचं मत माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या प्रेम भाटिया स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
स्वातंत्र्यानंतर आपण विविध भेदाभेदांमध्ये अडकून पडलो. कधी धार्मिक, कधी भाषिक तर कधी जातीपातीचे वाद समोर येत गेले. यात आपली बरीच उर्जा खर्च झाली, असं प्रकाश म्हणाले. 'देशाला मागे नेणारे वाद वारंवार उकरुन काढण्याची नव्हे, तर ते कायमस्वरुपी संपवण्याची आवश्यकता आहे. चीनमध्ये सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता), रोबोटिक्स आणि मशीन लर्निंगची चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीनं संशोधनदेखील केलं जात आहे. अशा परिस्थितीत आपण जर मंदिर आणि मशिदीवर बोलणार असू तर त्या केवळ निरर्थक गप्पा ठरतील,' असं प्रकाश म्हणाले.
देशांतर्गत सुरक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत प्रकाश यांनी व्यक्त केले. देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये शांतता प्रस्थापित होण्याआधी देशात शांतता निर्माण होणे जास्त गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
आपण चीनचे आव्हान समोर ठेवून तयारी करायला हवी, असे अरुण प्रकाश म्हणाले. 'चीनला आता एकही गोळी झाडण्याची गरज नाही. कारण भारताला घायाळ करण्याचे अनेक मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळेच आता चीनचे आव्हान मोडून काढण्याच्या उद्देशाने आपण सज्ज व्हायला हवे. आपण चीनशी दोन हात करण्याची तयारी केली, तर पाकिस्तानचे आव्हान असणार नाही,' असे प्रकाश म्हणाले.
No comments:
Post a Comment