Sunday, 4 August 2019

ओबीसी पदाधिकार्यांच्या स्थानबद्दतेच्या विरोधात सालेकसा कडकडीत बंद,लोकप्रतिनिधींचा निषेध


गोंदिया,दि.04ः- गोंदिया जिल्ह्यात शनिवारपासून आपल्या सरकारच्या जुमलेबाजीची माहिती देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या नावावर संवैधानिक पध्दतीने न्याय मागणाऱ्या गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना रात्रीला उठवून पोलिसांनी केलेल्या स्थानबद्दतेच्या विरोधात सालेकसा शहर कडकडीत बंद पाडण्यात आले.
तसेच ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानबद्द करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविण्यात आला. गोंदियातील मुख्यमंत्र्यांच्या सभेत उच्चवर्णीयांनी सेव मेरीट सेव नेशनच्या नावावर गोंधळ घातला, त्यांना रात्रभर ताब्यात न ठेवता ओबीसींच्या संवैधानिक लढ्यात सहभागी पदाधिकाऱ्यांना स्थानबध्द करण्यात आले. मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांनी केल्याने त्यांच्या या कृतीचा सर्व ओबीसी समाजाने निषेध नोंदविला.या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष डाॅ.खुशाल बोपचे यांनी सरळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडत तत्काळ सोडण्याची मागणी केली, त्यानंतर मुख्यमंत्री व पालकमंत्र्यानी पोलिस अधीक्षकांना सोडण्याचे आदेश दिल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोडले.

गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे व सालेकसा तालुकाध्यक्ष मनोज डोये यांना  रात्री 12 वाजता तर सडक अर्जुनी तालुका ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दिनेश हुकरे, पुष्पा खोटेले यांना पहाटे 5 वाजता, गोरेगाव तालुकाध्यक्ष गुड्डूू कटरे, अर्जुनी मोरगाव येथून उध्दव मेंदळनेना,देवरीत ज्योतीबा धरमशहारे यांना खबरदारी म्हणून,गोरेगाव सालेकसा,अर्जूनी मोर व डुग्गीपार पोलिसांनी झोपेतून उठवून ताब्यात घेतले.रावणवाडी पोलिसांनी गणेश बरडे यांना त्यांच्या राहत्याच घरीच नजरकैदेत ठेवले होते. विशेष म्हणजे आमगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तर गोंदियात सवर्णांनी गोंधळ घातल्याने तुम्ही ओबीसीचे कार्यकर्ते मोठा गोंधळ घालणार आहात त्यामुळे तुम्हाला ताब्यात घेण्यात येत असल्याचे गोरेगाव येथे म्हटले आहे.गोरेगाव पोलिस ठाण्यात तर ओबीसी कार्यकर्त्याच्या सोबत भाजपपदाधिकारीही पोचले आणि आधी सोडा अशी मागणी रेटली. अन्यथा मुख्यमंत्र्यांची सभाच पोलिस ठाण्याच्या आवारात घेऊ, अशी भूमिका घेतल्यानंतर एसडीपीओनी नरमते घेत मुख्यमंत्री येण्याआधी गुड्डू कटरे यांना सोडले. गोंदियातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे, महासचिव मनोज मेंढे,शिशिर कटरे,कोषाध्यक्ष कैलास भेलावे,प्रचार प्रमुख सावन डोये यांचेही नाव स्थानबद्दतेच्या यादीत पोलीसांनी घातले होते. या सर्व प्रकरणाचा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात चांगलेच पडसाद उमटले असून विद्ममान राज्यातील सरकारने ओबीसींचे खच्चीकरण करण्याचे षडयंत्र रचले गेल्याने निषेध नोंदविण्यात आले.
दरम्यान, देवरी येथे ओबीसी संघर्ष कृती समितीचे ज्योतिबा धरमशहारे यांना देवरी पोलिसांनी रात्री झोपेतून ताब्यात घेतल्याचे वृत कळताच देवरी तालुक्यात राज्य सरकारच्या या भेकड कृती विरोधात ओबीसी समाजाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कोणताही उपद्रव न करता सुद्धा सरकारने ओबीसी समाजाचे विधायक कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने मुख्यमंत्र्यांना कोणती भीती वाटली, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देवरी तालुक्यातील सत्ताधारी पक्षातील ओबीसींनी तर आमच्या पक्षाचे आदेश असल्याने आम्ही येऊ शकत नाही, असे म्हटल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या पक्ष कार्यकर्त्य़ांनी तर साधे फोन सुद्धा घेणे टाळल्याचे बोलले जात आहे..

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...