गडचिरोली,दि.10ः-तरुणांनो कष्ट करा अन् स्वत:चे पोट भरा, नक्षलवादाच्या नादी लागू आपले बहुमोल जीवन बरबाद करू नका, असे भावनिक आवाहन २0 जुलै २0१९ रोजी पोलिस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या रूपी नरोटे हिचे वडील महारू नरोटे यांनी केले आहे.
महारू नरोटे पुढे म्हणात, रूपीला बालवयातच नक्षलवादी आपल्यासोबत बळजबरीने घेऊन गेले. तिला आपल्यासोबत नेताना नक्षलवाद्यांनी ना आम्हाला काही विचारले ना त्याविषयी काही माहिती दिली. आम्ही तिचे नाव रूपी ठेवले होते. नक्षल्यांनी रूपीला सुशिला नाव दिले. नक्षलवादी रूपीला घेवून गेल्यापासून ती फक्त दोन वेळेस घरी आली. पहिल्या वेळी ती जेव्हा कोईंदूर येथे आपल्या राहत्या घरी आम्हाला भेटायला आली तेव्ही मी स्वत: तिला आमच्यासोबत राहा असे सांगून मी तुझे थाटामाटात लग्न लावून देतो, तुझा संसार सुरू करू, असे म्हणालो. परंतु तिने माझे ऐकले नाही आणि ती निघून गेली.
पोलिसांनी आम्हाला आत्मसर्मपण योजनेविषयी माहिती दिली होती. दुसर्यांदा जेव्हा रूपी आम्हाला भेटायला आली तेव्हा मी तिला तू नक्षलवाद्यांसोबत फिरणे सोडून दे, तू आत्मसर्मपण कर, आम्ही तुला पोलिसांकडे घेऊन जातो असे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हाही माझे ऐकले नाही. कदाचित तेव्हा जर तिने माझे म्हणणे ऐकले असते तर आज ती मेली नसती, असे सांगताना महारू नरोटे यांचा कंठ भरून आला. नक्षलवाद्यांमुळे आपली मुलगी मारली गेली. आमचा म्हातारपणाचा आधार गेला, असे सांगताना त्यांना रडू कोसळले. दलममध्ये गेलेल्या इतर आदिवासी तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल असे विचारताच त्यांनी नक्षलवाद्यांच्या नादी लागू स्वत:चे बहुमोल जीवन बरबाद करू नका, असे आवाहन केले.
नक्षलवादी हे रूपी उर्फ सुशिला नरोटे यांच्यासारख्या आदिवासी मुलींना व मुलांना बालवयातच त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय आपल्यासोबत घेवून जावूनत्यांना बळजबरीने नक्षल दलममध्ये काम करावयास भाग पाडतात, हे महारू नरोटे यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होते. तसेच बालवयातच त्यांना नक्षलवादी आपल्यासोबत घेऊन जाऊन त्यांचे इतर जनसामान्यांशी असलेली नाळ तोडतात. त्यांचे निरागस बालपण व शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतात. यामुळे ही मुले अशिक्षित राहिल्यामुळे तसेच बाहेरच्या जगाशी संबंध न आल्यामुळे ते विकासाच्या मूळ प्रवाहात येण्यास टाळाटाळ करतात. रूपीने जर तिच्या आईवडिलांचे ऐकले असते तर आज ती आत्मसर्मपण योजनेचा लाभ घेवून जनसामान्यांसारखे सुंदर जीवन जगत असती. त्यामुळे गावकर्यांनी पुढाकार घेऊन अशा नक्षल्यांना आत्मसर्मपण करण्यास प्रवृत्त करणे गजरेचे आहे.
दलममध्ये गेलेल्या आदिवासी तरूणांनी ‘नवजीवन योजनेचा’ लाभ घेवून विकासाच्या मूळ प्रवाहात परत येण्यासाठी पोलिसांसमोर आत्मसर्मपण करावे, पोलिस दल त्यांना सवरेतोपरी मदत करील, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment