Monday 27 February 2017

सैनिक कन्या म्हणते, ABVPला घाबरत नाही

नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठाच्या रामजास महाविद्यालयात बुधवारी (ता. 22) "अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' आणि डाव्या विचारसरणीच्या "ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन'च्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षानंतर दुसऱ्या दिवशी कारगिलमधील एका हुतात्मा सैनिकाच्या मुलीने सोशल मीडियावर "अभाविपला मी घाबरत नाही' असा प्रचार सुरू केला. तो आता व्हायरल झाला आहे. 
"जेएनयू'मधील विद्यार्थी उमर खालिद आणि शेहला मसूद यांना चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यावरून तणाव निर्माण झाला होता. त्यातून "अभाविप' व "एआयएसए'च्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्याने व्यथित झालेल्या गुरमेहर कौर या लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने ""मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. "अभाविप'ला मी घाबरत नाही. मी एकटी नाही तर देशातील प्रत्येक विद्यार्थी माझ्याबरोबर आहे,'' अशा मजकुराचा फलक हातात धरलेले छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. "स्टुडंट्‌स अग्नेस्ट एबीव्हीपी' या शीर्षकाखाली तिने सोशल मीडियावर प्रचार मोहीम सुरू केली आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेले कॅ. मनदीपसिंग यांची गुरमेहेर मुलगी आहे. 
"अभाविप'ने निरपराध विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला हा व्यथित करणारा असून, तो थांबवायला हवा होता. हा केवळ आंदोलकांवरील हल्ला नसून देशवासीयांच्या हृदयात वसणाऱ्या लोकशाहीतील प्रत्येक घटकावरील हल्ला आहे. कल्पना, नैतिकता, स्वातंत्र्य व भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारावरील हा हल्ला आहे. तुम्ही केलेल्या दगडफेकीमुळे आमच्या शरीरावर जखमा झाल्या तरी आमच्या मूल्यांना तुम्ही धक्का पोचवू शकत नाही. भयाच्या जुलमाचा निषेध मी माझ्या छायाचित्रातून केला आहे,'' असे तिने फेसबुकवर म्हटले आहे. 
गुरमेहरच्या पोस्टला मोठा प्रतिसाद 
साहित्याचा अभ्यास करणाऱ्या गुरमेहरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी व समवयस्कांनी तिची पोस्ट शेअर केली असून, विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी त्यांची फेसबुकवरील छायाचित्रे गुरमेहरच्या छायाचित्रांप्रमाणे करण्याचे आवाहन केले आहे. तिच्या पोस्टवर दोन हजार 100 प्रतिक्रिया आल्या असून, तीन हजार 456 जणांनी ती शेअर केली आहे, तर 543 कमेंट्‌स आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...