Wednesday 1 February 2017

प्राप्तिकर खात्यामार्फत "स्वच्छ धन मोहीम'

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर जुन्या नोटा जमा करणाऱ्यांना प्राप्तिकर खात्यातर्फे चौकशीची वाटत असलेली चिंता दूर करण्यासाठी सरकारने "स्वच्छ धन मोहीम' आजपासून सुरू केली आहे. यामध्ये संबंधित खातेधारकांकडे प्राप्तिकर खात्यातर्फे प्रत्यक्ष अधिकारी पाठवून चौकशी करण्याऐवजी "ऑनलाइन पडताळणी' केली जाईल, असे महसूल सचिव हसमुख अढिया यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
"स्वच्छ धन मोहिमे'मध्ये नऊ नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत बॅंक खात्यांमध्ये जमा झालेल्या रोख रकमांचे ई-व्हेरिफिकेशन (ई-पडताळणी) करण्याचा समावेश आहे. प्राप्तिकर खात्याने पहिल्या टप्प्यामध्ये 18 लाख खातेधारकांची यादी तयार केली आहे. या खातेधारकांचा करदाता म्हणून प्राप्तिकर खात्याकडे असलेला तपशील आणि जमा केलेल्या रोखीचा तपशील विसंगत असल्याचे आढळून आले आहे. त्यांचे ई-व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. याबाबतची माहिती incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर संबंधित "पॅन'धारकाला लॉग-इन केल्यानंतर मिळू शकेल. पोर्टलच्या "कम्प्लायन्स' विभागातील "कॅश ट्रॅन्झॅक्‍शन 2016' लिंकद्वारे ही माहिती बघता येईल. तसेच, प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात न जाता ऑनलाइन खुलासाही करता येईल. हा खुलासा सादर करण्यात अडचण येऊ नये यासाठी "युजर गाइड' आणि "क्विक रेफरन्स गाइड' पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 180042500025 या क्रमांकावरील हेल्पडेस्कवरूनही करदात्यांना मदत मिळवता येईल. मात्र, संबंधित करदात्यांना दहा दिवसांच्या आत पोर्टलवर आपला खुलासा करणे बंधनकारक असेल, असे हसमुख अढिया यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...