Saturday 11 February 2017

भावी पिढ्यांनी आदर्श गोंडी संस्कृतीचे जतन करावे- अर्थमंत्री मुनगंटीवार


गोंदिया,दि.११ : आदिवासी बांधव हा निसर्गाशी साधर्म्य राखून जीवन जगतो. पर्यावरणाची सुध्दा तो काळजी घेतो. आदिवासी गोंडी संस्कृती ही आदर्श असल्यामुळे येणाऱ्या भावी पिढ्यांनी या संस्कृतीचे जतन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.धनेगाव येथे पारी कोपार लिंगो माँ कली कंकाली देवस्थान कचारगड यात्रा महोत्सवानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून मुनगंटीवार बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, पालकमंत्री राजकुमार बडोले, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार संजय पुराम, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, देवरी पं.स.सभापती देवकी मरई, जि.प.सदस्य सीमा मडावी, आदिवासी नेते डॉ.एन.डी.किरसान यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्या गावामध्ये सर्व आदिवासी बांधव राहतात तेथे त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यासाठी त्या गावांना ५ टक्के निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अंगणवाडीतीलआदिवासी बालके सदृढ राहावेत यासाठी बालकांच्या आरोग्याचा विचार करुन त्यांच्यासाठी एपीजे अब्दूल कलाम चौरस आहार योजना सुरु केली आहे. आदिवासींच्या घरकुलासाठी शबरी योजनेत वाढ केली आहे. ज्या आदिवासी बांधवांना घरे नाहीत त्यांना २०१९ पर्यंत घरकूले बांधून देण्यात येईल.कचारगड येथे येणाऱ्या भावीकांची भविष्यात गैरसोय होणार नाही असे सांगून श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले, योग्य नियोजनातून पहिल्या व दूसऱ्या टप्प्यात विकासाची कामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहे. कचारगडच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार असून यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने दरवर्षी आदिवासी बांधव येतात. आता आदिवासी बांधवांनी त्यांच्या उन्नतीसाठी व विकासासाठी चिंतन करावे सोबतच समाज व पर्यावरणासाठी काम करावे. वनाबाबत केंद्र सरकारचे कायदे असल्यामुळे कचारगड देवस्थानासाठी लागणाऱ्या वन जमिनीसाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलस्ते म्हणाले, देशातील अनेक राज्यामध्ये गोंडी भाषा बोलली जाते. या भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी तिला केंद्राच्या आठव्या सूचित समावेश करण्यासाठी विविध राज्याच्या विधानसभेतून प्रस्ताव पारीत करुन केंद्रसरकारकडे पाठवावा, त्या आधारावर केंद्र सरकारला आठव्या सूचित समावेश करणे सोपे होईल. अनेक जाती आदिवासी जमातीत समावेश होण्याची मागणी करीत आहे. त्या समाजाच्या चालीरिती, संस्कृती हया आदिवासी संस्कृतीशी निश्चितच जुडणाऱ्या नाही. आदिवासी जमातीत इतर जातींचा समावेश हा संशोधनाअंती होणे कठीण बाब असल्यामुळे व जातींना समावेशासाठी आपला विरोध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जे खरे आदिवासी नाहीत ते आदिवासींच्या विविध सवलतींचा लाभ घेत असल्याचे सांगून श्री.कुलस्ते म्हणाले, त्यामुळे खरा आदिवासी बांधव मुलभूत सुविधा व सवलतीपासून आजही वंचित आहे. वैद्यकीय महाविद्यालय, इंजिनियरिंग व अन्य व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीपासून देखील वंचित आहे. कचारगड देवस्थान परिसरातील १९४ हेक्टर जमीन ही वनविभागाच्या मालकीची आहे. या जमिनीची सरकारकडे सामुहिक वनहक्क दाव्याअंतर्गत ग्रामपंचायतमार्फत सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मागणी करावी. याबाबतचे अपिल राज्याच्या मुख्य सचिवांकडे दाखल करावे. देशातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव इथे येत असल्यामुळे हे राष्ट्रीय श्रध्दास्थान आहे. त्यामुळे केंद्रसरकारकडून इथल्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्य सरकारने तसा परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.कचारगड तीर्थस्थळाला ब दर्जा मिळवून देण्यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले, ब दर्जा प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारकडून इथल्या विकासाला थेट निधी मिळण्यास मदत होईल. कचारगडच्या विकासासाठी राज्य सरकारकडून ५ कोटी रुपयाचा निधी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्ह्यातील महत्वाच्या तीर्थस्थळी पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वनविभागाची जमीन कचारगड देवस्थानाच्या विकासासाठी धनेगाव ग्रामपंचायतला दयावी. इथे ज्या-ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून भाविकांची निवासाच्या दृष्टीने गैरसोय टाळण्यासाठी येथे भक्त निवास बांधण्यात आले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आमदार पुराम म्हणाले, देशातील लाखो आदिवासी बांधवांचे कचारगड हे श्रध्दास्थान आहे. गोंडी संस्कृतीचा उगम हा येथूनच झाला आहे. इथे येणाऱ्या भाविकांची भविष्यातय गैरसोय होणार नाही यासाठी आपण काळजी घेणार आहो. या तीर्थस्थळाला ब दर्जा मिळाल्यास इथल्या विकासाला गती येईल. आदिवासी बांधवांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण दयावे. त्यामुळे त्यांची प्रगती होण्यास निश्चितच मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी युवक-युवतींनी गोंडी संस्कृतीचे दर्शन घडविणारे समूह नृत्य सादर केले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...