Thursday 16 February 2017

प्रधानमंत्र्यासह मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बूच लावा - उद्धव ठाकरे

पुणे - "सामना' बंद ठेवण्याची मागणी भाजप करत आहे. ही आणीबाणी नाही का?  मग कोणत्या अधिकाराने इंदिरा गांधीवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यावरून त्यांना छुपी आणीबाणी आणायची आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या तोंडाला आधी बूच लावा, अशी विखारी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
"परिवर्तन तर होणारच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी आयुष्य वाहून भारतीय जनता पक्ष उभा केला. ते जाऊन आता भाजपमध्ये गुंडांचे राज्य येणार, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तोफ डागली. "शब्द देतो म्हणणाऱ्यांनी आतापर्यंत दिलेले किती शब्द पाळले. विश्‍वास ठेवू नका, आम्ही फसलो, तुम्ही फसू नका,' असे आवाहन त्यांनी पुणेकर मतदारांना केले. 
महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. तासभराच्या भाषणात ठाकरे यांनी भाजपने गुंडांना दिलेला प्रवेश, युती तुटण्यामागचे कारण, भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती यावर भाष्य केले. ते म्हणाले, ""जागावाटपावरून युती तर तुटली. गेली पंचवीस वर्षे निष्ठेने आम्ही त्यांच्याबरोबरच राहिलो. प्रत्येक संकटात खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिलो. त्यांची अनेक वर्षे ओझी आम्ही वाहिली. मात्र केंद्रात सत्ता आल्यानंतर त्यांच्या वर्तनात परिवर्तन झाले. गुंडा-पुंडांना बरोबर घेऊन भाजप पुढे जाणार असेल, ते आम्हाला मान्य नाही, म्हणून युती तोडली. या पुढे काही झाले, तरी त्यांच्याबरोबरच युती नाही. मुख्यमंत्री माझे चांगले मित्र आहेत. परंतु जो मित्र राज्याची, राजधानीचा अवलेहना करीत असेल, तर मैत्री गेली खड्ड्यात. माझी बांधली ही जनतेशी आहे.'' 
नोटांबदी, शेतकऱ्याची कर्जमाफी पासून मुंबईत अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अयोध्येतील राममंदिर यांचा उल्लेख करून ते कधी पूर्ण करणार, असा सवालही त्यांनी भाजपला केला. 
दोन्ही कॉंग्रेसबरोबर शिवसेनेचे सेटिंग आहे, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, ""शिवसेनेत सेटिंग लावणारे सैनिक नाहीत. सैनिक सेटिंग करून कधीही लढाईला जात नाहीत. शिवसेना कधीही फ्रेंडली मॅच खेळत नाही. सोबत असाल, तर मित्र आणि समोर असला, तर दुश्‍मन. मुख्यमंत्री म्हणतात, टीका कशाला करता, मग तसे वागू नका. भूक असेल, तेवढेच खा. परंतु त्यांना खा खा सुटली आहे. आम्ही व्यक्तीवर नाही, तर त्यांच्या वृत्तीवर टीका करतो. तुम्ही जे करता ते जर राज्याच्या आणि देशाच्या मुळावर येणार असेल, तर टीका करणारच. तो माझा अधिकार आहे. शिवसेनेने टेकू दिल्यामुळे तुमची खुर्ची टिकली आहे.'' 
पुण्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, ""पुणेकरांनी त्यांना भरभरून दिले. एक खासदार आणि आठ आमदार दिले. परंतु त्यांनी पुणेकरांना काय दिले? आजपर्यंत तुम्ही कॉंग्रेसचा कारभार पाहिला, राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिला आणि भाजपचे परिवर्तनही पाहिले. आता शिवसेनेला एक संधी द्या. कधी तरी महापालिकेवर भगवा फडकवू द्या. मुंबईसारखा पुण्याचाही आम्ही विकास करू.'' 
या वेळी संपर्कप्रमुख अमोल कोल्हे, शहरप्रमुख विनायक निम्हण, राज्यमंत्री विजय शिवतारे, शशिकांत सुतार, आमदार नीलम गोऱ्हे, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, रमेश बोडके आदी उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवारांना या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. तसे पत्र पक्षाचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी ठाकरे यांना दिले. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...