Saturday 13 May 2017

नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मध्य भारतातील पहिल्या लासिक लेझरचे लोकार्पण


दरवर्षी 25 कोटी रुपये याप्रमाणे तीन वर्षात निधी
आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट म्हणून मेडिकलचा विकास
नागपूर ,दि.13: आशिया खंडातील सर्वात उत्कृष्ट आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले हॉस्पिटल म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विकास करण्यासाठी दरवर्षी 25 कोटी रूपये याप्रमाणे तीन वर्षात 75 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्ररोग विभागात 3 कोटी 10 लक्ष रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या मध्य भारतातील पहिल्या आणि जेजे रुग्णालयानंतर राज्यातील दुसऱ्या अत्याधुनिक लासिक लेझर यंत्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मेडीकलच्या नेत्ररोग विभागातर्फे आयोजित लोकार्पण सोहळ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान, प्रशासकीय अधिकारी डॉ. जगदीश हेडाऊ, डॉ. मधुकर परचंड, डॉ. मोना देशमुख आदी उपस्थित होते.लासिक लेझर या उपकरणामुळे डोळ्यावरील चष्मा लावण्याची आवश्यकता राहणार नसून नेत्ररोगासंबंधी विविध आजारावर शस्त्रक्रियेद्वारा उपचार मेडीकलमध्येच उपलब्ध होत असल्याचे सांगताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुंबई नंतर राज्यातील पहिले उपकरण मेडीकलमध्ये सुरु होत आहे. खाजगी रुग्णालयात 50 हजार रुपये येणारा खर्च आता अल्पदरात होणार असल्यामुळे सामान्यरुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यावेळी बोलतांना म्हणाले की,स्वच्छतेचे मेडिकल मॉडेल विकसित करण्यात आले असून दररोज संपूर्ण परिसराची स्वच्छता राखण्यात येते. नेत्र विभाग कायम दुर्लक्षित राहात होता परंतु पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्यामुळे लासिक लेझर सारखे अत्याधुनिक उपकरण उपलब्ध झाले आहे. हॉस्पिटलमधे मागील दोन वर्षात किडनी रोपण सारख्या अवघड शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहेत, आकस्मिक अपघात विभाग (ट्रामा) साठी 25 कोटी रूपये उपलब्ध झाले, 3 आयसीयू विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव असून यासाठी 64 कोटी रुपयाची आवश्यकता आहे.
यावेळी नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेडिकलमधील नेत्र विभागात बसविण्यात आलेल्या लासिक लेझर युनिटचा शुभारंभ दीपप्रज्वलीत करुन केला. तसेच या अद्ययावत उपकरणांची माहिती घेतली. यावेळी विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी नेत्ररोग विभागाच्या सुविधांबद्दल माहिती दिली.

लासिक लेझर शस्त्रक्रियेमुळे चष्मा मुक्ती
  • लासिक लेझर उपकरण अमेरिकन बनावटीचे आहे. याची किंमत 3 कोटी 10 लक्ष रुपये आहे.
  • जिल्हा नियोजन मंडळ विकास निधीतून निधी उपलब्ध.
  • कॉन्टक्ट लेन्स वापरणाऱ्यांना होणारा त्रास तसेच चष्मा सुद्धा सुटणार आहे.
  • नोकरीसाठी, खेळाडूसाठी तसेच चष्मा असण्यावर बंदी असलेल्यांवरही उपचार शक्य.
  • बुबुळासंबंधी असलेल्या सर्व आजारावर सहज व सुलभ उपचार शक्य.
  • शस्त्रक्रिया यशस्वी व विश्वासहार्य आहेत.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...