Sunday 14 May 2017

मॉन्सून अंदमानमध्ये दाखल; हवामान विभागाची माहिती


Southwest monsoon hit to Andaman Nicobar Islands : IMD
पुणे,दि.14 (वृत्तसंस्था) - देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (रविवार) भारताच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. 

यावर्षी साधारणपणे सरासरी 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. देशात नेमका किती पाऊस होईल, हे चित्र जूनच्या पहिल्या आठवड्यात अधिक स्पष्ट होईल, असे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. बंगालच्या उपसागरात मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्याने येत्या चार दिवसांत मॉन्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज होता. पण आजच मॉन्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान-निकोबार बेटांवर जोरदार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे 20 मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर पुढील दहा दिवसांत म्हणजेच एक जूनपर्यंत तो श्रीलंका व्यापून केरळात प्रवेश करतो. यावर्षी 15 मे पर्यंत मोसमी वारे अंदमानात येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण, मॉन्सून लवकरच दाखल झाल्याने भारतातही त्याचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. 
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत नागालॅंड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या राज्यांत जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर छत्तीसगड आणि विदर्भात उष्णतेची लाट असेल. अंदमान-निकोबार बेटांवर दरवर्षी साधारणपणे 20 मे रोजी मॉन्सून दाखल होतो. पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन शाखांद्वारे मॉन्सूनचा भारतात प्रवास होत असतो. अंदमानात दाखल झाल्यानंतर केरळमध्ये एक जून, तळकोकणात पाच ते सात जूनच्या सुमारास मॉन्सूनचे आगमन होते. त्यानंतर विविध भागांत सक्रिय होत 15 जुलैपर्यंत मॉन्सून देश व्यापतो.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...