Tuesday 2 May 2017

४०० कोटींचा तूरडाळ घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ? - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 2 - महाराष्ट्रात ‘तूरडाळ’ घोटाळा झाला आहे काय? कारण ४०० कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार नसून पारदर्शक असे भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे तूरडाळ घोटाळ्याचे खापर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवर फोडता येणार नाही. ४०० कोटींचा घोटाळा होईपर्यंत सरकार झोपले होते काय ?  असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. 
 
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून त्यांनी  आपल्याच सरकारला सुनावले आहे. ४०० कोटी हा सरकारी आकडा आहे. हा आकडा ७००-८०० कोटींपर्यंत सहज असू शकतो. तूरडाळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर माती खायची वेळ आली आहे. तूरडाळीचे उत्पादन जास्त झाले, त्यामुळे भाव कोसळले. हे नेहमीचेच उत्तर आहे. मुळात सरकार बदलले तरी शेतकऱ्यांबाबतचे धोरण आणि नियोजन साफ फसले आहे अशी टीका उद्धव यांनी केली आहे. 
 
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज नसल्यामुळे हे सर्व घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आता दिली आहे ठीक आहे, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला नाही आणि मुख्यमंत्र्यांना सरकारी केंद्रावरील व्यापाऱ्यांच्या तूरडाळ घोटाळ्याचा अंदाज आला नाही. सरकार मस्त मजेत आणि खुशीत आहे व शेतकरी मात्र पानिपत झाल्यासारखा कोसळला आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...