Saturday 13 May 2017

शुभमंगल सावधान होताच वधू पोहोचली परीक्षा केंद्रावर!


 आमगाव,दि.13 : क्रांतीसूर्य महात्मा फुले,सावित्रीमाई फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच  शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याचा संदेश दिला होता.त्या मूलमंत्राचा स्विकार करीत लग्नांच्या मंडपात मंगलाष्टके होताच लग्नमंडपातून आपल्या शैक्षणिक परिक्षेचा पेपर देण्यासाठी २0 किलोमीटर अंतर कापून वधू भवभूती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर पोहोचली.
आमगाव तालुक्यातील गोमाजी हुकरे यांची मुलगी ममता ही भवभूती महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पदवीची विद्यार्थिनी आहे. शिक्षण घेत असतानाच तिचा विवाह शंभुटोला येथील गजानन भय्यालाल शेंडे याच्याशी जुळला. दोन्ही कुटुंबीयांनी लग्नाची निर्धारित वेळ काढली; लग्नसोहळा  व ममताच्या परीक्षेचा वेळापत्रक एकच.त्यातच ममताने पदवीची परीक्षा देणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीय मुलीच्या भवितव्याशी सहमत होऊन पाठीशी उभे राहिले.
ममता हिच्या मूळ गावात १२ मे रोजी दुपारी १0 वाजता लग्न ठरविण्यात आले; परंतु त्याच दिवशी ममताचा पेपर दुपारी २.३0 वाजता नियोजित होता. एकीकडे ममताचा लग्नसोहळा तर दुसरीकडे पदवीचा पेपर देण्याची तळमळ यामुळे ती अधिक विचलित झाली होती. तिने वर पक्षाला वेळेवर लग्न लावा, असे सांगून मला पदवीचा प्राणीशास्त्र विषयाचा पेपर दुपारी द्यायचा आहे, असे सांगितले. यात दोन्ही कुटुंबीयांनी सहमती दर्शविली; परंतु वर पक्षाकडून लग्नाची वरात दुपारी १ वाजे पोचली.आधीच उशीरा आलेल्या वरामूळे मनात धाकधुक होतीच.परंतु कुठलीही गडबड न करता घाईघाईत मंगलाष्टके म्हणून शुभमंगल करण्यात आले.शुभमंगल होताच ममता ठरल्याप्रमाणे लग्नमंडपातून रजा घेत २0 किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्रावर पोहोचली. यावेळी मन विचलित होऊ न देता तिने शांतपणे पदवी परीक्षेचा ‘प्राणिशास्त्र’ या विषयाचा पेपर दिला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...