Wednesday 31 May 2017

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षावर अविश्वास पारीत; शिक्षकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी



भंडारा,दि.31 : भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांविरोधात मंगळवारला अविश्वास प्रस्तावावर चर्चा होती. याकरिता आलेल्या संचालकांविरुद्ध रोष व्यक्त करून शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोरच  हाणामारी केली. तणावाच्या वातावरणात विद्यमान अध्यक्षांविरुद्ध १० विरूद्ध शून्य मताने अविश्वास ठराव पारित करण्यात आला.
भंडारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने यांच्याविरूद्ध हा अविश्वास ठराव पारित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष असलेल्या गायधने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संघातील पाच संचालकांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेशी हातमिळवणी केली. अखिलचे पाच व विद्यमान कार्यकारिणीतील पाच अशा दहा संचालकांनी अध्यक्षांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर हे दहाही संचालक पर्यटनवारीवर गेले होते. या दहा संचालकांमध्ये रमेश सिंगनजुडे, शंकर नखाते, रमेश काटेखाये, विजया कोरे, शिवकुमार वैद्य, अनिल गयगये, भैय्यालाल देशमुख, प्रकाश चाचेरे, संजीव बावनकर, यामिनी गिऱ्हेपुंजे यांचा समावेश आहे.
या अविश्वास प्रस्तावावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज दुपारी १ वाजता चर्चा आयोजित केली होती. याकरिता पर्यटनवारीवरील हे दहाही संचालक पाच मिनिटांपूर्वी वाहनाने कार्यालय परिसरात दाखल झाले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शेकडो शिक्षकांनी फुटीरवादी संचालकांविरुद्ध घोषणाबाजी केली. यातील काहींनी या संचालकांना पकडून धक्काबुक्की व मारहाण करीत कपडे फाडले. दोन शिक्षक संघटनांच्या राजकीय वर्चस्वाच्या अधिपत्यामुळे हा प्रकार घडला. आक्रमक शिक्षकांच्या तावडीतून संचालकांना कसेबसे बाहेर काढून जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. यानंतर सहाय्यक उपनिबंधक एस.जे. हटवार व सहकार अधिकारी श्रेणी २ चे निलेश जिभकाटे यांच्यापुढे या दहाही संचालकांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा केली. चर्चेदरम्यान पतसंस्थेचे संचालक रमेश सिंगनजुडे यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला आणि त्याला उपस्थित नऊ संचालकांनी अनुमोदन दिले. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अन्य एक संचालक गैरहजर होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...