Wednesday 31 May 2017

सत्तेचा माज आणि नेत्यांची दादागिरी


संपादकीय

सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तोल सुटत असल्याच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. लोकशाही असलेल्या देशात गेल्या तीन वर्षात राजकीय मूल्ये पायदळी तुडविल्या जात असल्याचे निदर्शनात येत आहे..  लोकशाही राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपापली भूमिका बजावत असताना नैतिक मूल्ये सुद्धा जपायची असतात. एकमेकांचा अनादर वा अपमान होणार नाही, याची दक्षता दोन्ही बाजूच्या नेत्यांनी घेणे अपेक्षित आहे. परंतु, दुर्दैवाने गेल्या तीन वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजपच्या काही नेत्यांना आपण काहीही केले वा बोलले तर आपले कोणीही वाकडे करू शकत नसल्याची भावना वाढीस लागल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी ओबीसी समाजातील कार्यकर्ते राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री असलेल्या ना. राजकुमार बडोले यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी उद्धट भाषेचा वापर करून ओबीसी समाजाची चांगलीच धुवून काढली होती. ती घटना ओबीसी अद्यापही विसरलेले नाहीत. एका मंत्र्याने बहुसंख्य समाजाचा असा अपमान करण्याची राज्यातील कदाचित ही पहिलीच वेळ असावी. अलीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुद्धा शेतकऱ्यांविषयी अपशब्द काढले. देशाचा पोशिंदा असलेल्या बाळिराजाला शिवराळ भाषेत बोलताना निवडणुकीत आपण दिलेल्या आश्वासनाचे भान राहू नये, हे न समजण्याइतपत दानवे साहेब दुधखुळे नक्कीच नाहीत. त्यानंतर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभालाच आव्हान देत मारहाणीची भाषा वापरली. त्याचाच कित्ता गिरवत गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी तर गोंदियाच्या बाजार समितीच्या उपाध्यक्षाला चक्क आमदार, जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांदेखत मारपीट करण्याची जाहीर धमकी दिली. ही घटना घडली तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सभागृह सोडले तर आमदार परिणय फुके यांनी अग्रवाल यांच्या वागण्यावर नापसंती व्यक्त केली. यावरून जनतेने काय समजायचे. या घटनेतून विनोद अग्रवाल यांचा ओबीसी समाजावर असलेला राग अधोरेखित होतो. विनोद अग्रवाल विरोधी पक्षात असताना ते आमदार गोपाल अग्रवाल यांच्यावर कशा प्रकारे टीका करायचे याचे भान आता विनोद अग्रवाल यांना राहिलेले नाही. भाजपला देशात व राज्यात पूर्णरुपाने सत्तेत येऊन केवळ तीनच वर्षे झाली आहेत. त्यातही विनोद अग्रवाल हे भाजपचे केवळ माजी अध्यक्ष आहेत. तरी पण त्यांनी ठाकरे यांना अधिकारी-पदाधिकारी यांच्या समोर मारण्याची जाहीर धमकी दिली. जर ते आमदार असते तर काय झाले असते, याची कल्पना केली तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. आमदार अग्रवाल यांच्यावर आरोप करणारे भाजपचे हे पदाधिकारी आता कोणती भाषा करीत आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
देशात मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपला सत्ता मिळाली, असे बोलले जात असले तरी भाजपच्या काही नेत्यांना कदाचित ते मान्य नसावे. किंबहुना आपण जनतेची आयबहीण एक केली तरी आपली सत्ता कोणी हिरावू शकत नाही, अशी गरमी या नेत्यांमध्ये तर आली नसावी ना? या सर्व बाबींचा विचार भाजप श्रेष्ठींना करण्याची वेळ आली आहे. अन्यथा मोदींनी कमावले आणि वाचाळ नेत्यांनी लुटले, अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. आमदार परिणय फुके यांच्या समोर घडलेल्या या प्रकाराची खुद्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दखल घ्यावी, असा विचार सामाजिक स्तरावरून प्रकट होत आहे. भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांमध्ये पैसा आणि सत्ता यामुळे निर्माण झालेला घमेंड कोणत्या स्तराला जाईल, याचा सध्या तरी नेम नाही. अशा नेत्यांच्या कृत्यांविषयी पक्षाने सारवासारव करण्याची वृत्ती सोडून जनतेला दम देणाèयांना त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...