Monday 15 May 2017

दारू दुकानाच्या स्थानांतरणावरून गाजली ग्रामसभा




एकोडी(गोंदिया),दि.14 : येथील ग्रामपंचायत कार्यालयात (दि.१३) तहकूब ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतने अनेक विषयावर चर्चा केली. परंतु दारू दुकानाच्या स्थानांतरण या एकाच विषयाने ग्रामसभा गाजली.1 मे रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत लोकसंख्येच्या कमीत कमी १०० लोकांची उपस्थिती आवश्यक होती. ती नसल्याने तहकूब करून १3 मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी प्रकाश पटले पं.स. सदस्य, माजी उपसरपंच किरणकुमार मेश्राम, अजाबराव रिनायत, सावलदास कनोजे, नामदेव बिसेन ग्रा.पं. सदस्य व सभेचे अध्यक्ष सरपंच रविकुमार पटले यांनी आपापले विचार मांडले. याप्रसंगी गावातील महिला-पुरूष मोठ्या संख्येत उपस्थित होते.
ग्रामसभेचे अध्यक्ष रविकुमार पटले यांच्या अनुमतीने ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्याचे निर्देश ग्राम विस्तार अधिकारी यांना दिले. त्यानुसार ग्रामसभेला सुरुवात करीत जमा खर्चाला मंजुरी देणे, नवीन कामाचे नियोजन करणे, मनरेगा अंतर्गत घरकुल व शौचालय बांधकामाची माहिती देणे अशा अनेक विषयावर चर्चा करायची होती. परंतु जमाखर्च वाचून झाल्यावर नंतर येणाऱ्या विषयावर दारु दुकान स्थानांतरणाचा विषय होता. मोठ्या संख्येने उपस्थित महिला पुरुषांनी वेळ न घालवता ज्या विशेष मुद्यावर लोकांची नजर होती तोच विषय लोकांकडून प्रथम घेण्यावर भर देण्यात आला.त्यानुसार ग्रामविकास अधिकारी ओ.एन. तुरकर यांनी चर्चेला सुरुवात करीत ग्रामपंचायत कडे दोन दारु दुकानाचे (ज्यामध्ये एक बियरबार व एक चिल्लर व थोक देशी दारू) दुकान मालकाकडून दारु दुकान स्थानांतरण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतकडे आल्याचे सांगितले. न्यायालयच्या आदेशाने शासनाला राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग यांच्यापासून ५०० मिटर अंतरावर असलेल्या दारू दुकानाला मुख्य रस्त्यापासून ५०० मिटर दूर हटविण्याचे ३१ मार्च २०१७ नंतर बंद करण्याचे आदेश दिले होते. सचिवाने दोन दारु दुकानासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्याचे सांगितले.
परंतु या विषयावर चर्चा करीत असताना असे लक्षात आले की बियरबार मालकाकडून ग्रामपंचायतकडून कोणतीच परवानगी न घेता लोकवस्तीत असलेल्या घरमालकाशी बोलणीकरुन त्या घराची बियरबारला लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधां नियोजित घर तयार करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायतने सांगितले. त्यावरुन दारु दुकान समर्थक आणि विरोधक यांच्या एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जरी दोन्ही दुकान हे शासन मान्यतेचे असले तरी त्यांना दुकानाच्या स्थानांतरण प्रक्रियेत लोकवस्तीत दुकान लावण्याचे काहींचे म्हणणे होते. तर समर्थकांकडून असे उदाहरण देण्यात आले की जे दुकान गावात बेकायदेशीर व अवैध रुपाने सुरू आहेत त्यांचे काय? जर गावात शासनमान्य परवाना धारक दुकानाला जर परवानगी ग्रामपंचायत देत नसेल तर गावात सुरू असलेले अवैध दारू दुकान बंद झाले पाहिजे असे दारू दुकान समर्थकांचे म्हणणे होते. हा मुद्दा खूपवेळेपर्यंत रेंगाळत राहिला. यावर मतदान करुन संपूर्ण दारूबंदी गाव करण्यासाठी चर्चा सुरू करण्यात आली. परंतु उपस्थित लोकांनी संपूर्ण गाव दारुबंदी करण्याकडे कानाडोळा केला. परत बियरबार करीता नियोजित घराच्या जागेवरच चर्चा सुरू करण्यात आली. परंतु त्यातही मोठ्या संख्येत दारू दुकान समर्थक महिला व पुरुष असल्याचे दिसून आले. मतदान होवून त्या जागेवर दुकान लागण्3चे जवळपास निश्चित झाले होते. पण विरोधकांनी कित्येक दिवसापूर्वीच ग्रामपंचायतला अर्ज देवून परवानाधारक दुकान असल्याने लोकवस्ती व लोकहित, सामाजिक प्रश्न याचा विचार करुनच लोकवस्तीत दारू दुकानाला परवानगी न देता लोकवस्तीपासून दूर अंतरावर दारू दुकान लावण्यास हरकरत नाही असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे तुर्त या विषयावर तोडगा निघाल्याचे दिसून येते. याविषय नंतर ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच यांनी उपस्थित महिला-पुरुषांना संपूर्ण दारूबंदी गाव करण्याकरिताही समर्थन देण्याचे आवाहन केले. सरपंचाच्या आवाहनाला किती महिलांचे व पुरुषांचे समर्थन करतील याकडे विशेष लक्ष लागून राहील. परंतु लोकवस्तीचा प्रश्न उपस्थित करुन दारू विक्रेत्यांकडून ग्रामसभेत बोलावण्यात आलेला जनसमुदाय असूनही दारू विक्रेत्याचा डाव फसल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...