Wednesday 17 May 2017

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू


गोंदिया दि.१७(berartimes.com): कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दोन दिवसापूर्वी दाखल झालेल्या महिलेवर बालाजी नर्सिंग होम येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान तिची प्रकृती बिघडल्याने पुन्हा बालाजी नर्सिंग होम येथे तिला दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती आटोक्याबाहेर असल्याचे सांगून बालाजी नर्सिंग होम येथील डॉक्टरांनी तिला केएमजे नर्सिंग होम येथे हलविण्याचा सल्ला दिला. केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार (दि.१५) दुपारी १२ वाजताची आहे. मुस्कान योगेश समुद्रे (३१) रा. गोंदिया असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
या घटनेवरुन केएमजे रुग्णालयात मृताच्या कुटुंबीयांनी चांगलाच संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे केएमजे नर्सिंग होमचे मुख्य डॉक्टर जायस्वाल यांनी सदर महिलेचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास चक्क नाकारले. यावरुन सदर महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला, असा आरोप करण्यात आला आहे.सविस्तर असे की, मुस्कान योगेश समुद्रे या महिलेला दोन अपत्य असल्यामुळे १२ मे रोजी बालाजी नर्सिंग होममध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, तिच्यावर शस्त्रक्रियाही झाली. दोन दिवसानंतर मुस्कानला नर्सिंग होममधून सुट्टी देण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या पोटात दुखने सुरु झाल्याने तिला पुन्हा बालाजी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यातच तिची प्रकृती चिंताजनक असल्याने बालाजी नर्सिंग होमच्या डॉक्टरांनी तिला केएमजे रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.यावरुन कुटुंबीयांनी वेळ वाया न घालविता त्वरित मुस्कानला केएमजे नर्सिंग होममध्ये दाखल केले. उपचारा दरम्यान तिचा केएमजे रुग्णालयात मृत्यू झाला. यावर मृताच्या कुटुंबीयांनी केएमजे नर्सिंग होमच्या मुख्य डॉक्टराला मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी चक्क नकार दिला. यावरुन रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.दरम्यान, पोलिसांना पाचारण करुन परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...