Monday 15 May 2017

आधुनिक विज्ञानाच जगाला शाश्वत विकासाचा नवा प्रकाश दाखवेल-मुख्यमंत्री



पुणे दि. 14 (विमाका) : प्राचीन काळापासून भारत हा विज्ञानात प्रगत होता. भारतीय पारंपारिक विज्ञान हे निसर्गावर आधारित असल्याने ते शाश्वत विकासाचे साधन आहे. भारतीय पारंपारिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुयोग्य संगमच जगाला विकासाचा नवा शाश्वत प्रकाश दाखवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. तसेच याच धर्तीवर प्रत्येक वर्षी आपल्या राज्यात महाराष्ट्र विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी आयोजकांना केली.
महाराष्ट्र शासन, विज्ञान भारती, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, विज्ञान भारतीचे संघटनमंत्री जयंत सहस्त्रबुद्धे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे संचालक डॉ. सुरेश मांडे, शरद कुमठे, शेखर कामटे, संमेलनाचे संयोजक मुकुंद देशपांडे उपस्थित होते.
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय प्राचीन विज्ञानाने जगाला मोठी देणगी दिली आहे. भाषा, विज्ञान, विविध शास्त्रात प्राचीनकाळी भारत अग्रेसर होता. आधुनिक विज्ञानाने लावलेल्या अनेक शोधांचा उल्लेख आपल्या पुरातन वेद, उपनिषीदांत आहे, हाच आपल्या पारंपारिक शास्त्र प्रगत असल्याचा पुरावा आहे. भारतातील तक्षशिला विश्वविद्यालय दीड हजार वर्षे जगाला ज्ञानाचा प्रकाश देत होते. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी तक्षशिलासह नालंदा विद्यापीठात ज्ञानार्जनासाठी येत होते. पारंपारिक विज्ञान हेच शाश्वत असून निसर्गाशी एकरूप होते. आधुनिक विज्ञानाच्या आधारावर प्रगत झालेले देश हे प्रदूषणकारी आहेत. प्रदूषणाच्या प्रश्नाला आपले पारंपारिक विज्ञान हेच उत्तर आहे. पारंपारिक विज्ञान हे शाश्वत विकासावर आधारित आहे, विनाशावर नाही. आधुनिक विज्ञानाने प्रगती साधली मात्र ती शाश्वत नसून या प्रगतीबरोबरच अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे यापुढे पारंपारिक विज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा सुयोग्य संगमच जगाच्या विकासाला आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
केन्द्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भांबरे म्हणाले, आधुनिक विज्ञानाचे मूळ हे आपल्या पारंपारिक विज्ञानात आहे. आयुर्वेद ही आपल्या देशाने जगाला दिलेली मोठी देणगी  आहे. भारतीय पारंपारिक विज्ञानाने धातूशास्र,खगोलशास्त्रात अनेक शोध लावले होते. आपल्या पारंपारिक विज्ञानाला आधुनिकतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी स्वत:वर विश्वास ठेवून या क्षेत्रात झोकून देऊन काम करण्याची आवश्यकता आहे.यावेळी महापौर मुक्ता टिळक, कौस्तुभ साखरे, मुकुंद देशपांडे यांची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...