Thursday 8 February 2018

पोटनिवडणुकीत जनमताचा कौल सत्ताधाऱ्यांविरोधातही!

भंडारा-गोंदियात होणारी निवडणूक सत्ताधारी भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

पोटनिवडणुकांमध्ये सहानुभूतीचा फायदा होतो, असे अनेकदा स्पष्ट झाले असले तरी प्रस्थापितांच्या विरोधातही अनेकदा कौल गेले आहेत. अगदी अलीकडेच राजस्थानमधील तिन्ही पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कौल मतदारांनी दिला आहे.
नाना पटोले यांनी भाजप आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पोट निवडणुकीसाठी भाजपसह इतरही पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. नागपूर, विदर्भ आणि काही प्रमाणात राज्यातही गत काही वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल लक्षात घेतले तर त्यात मतदारांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध राग व्यक्त केल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर भंडारा-गोंदियात होणारी निवडणूक सत्ताधारी भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
२००४ ते २०१४ या काळात केंद्रात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस आघाडीचे तर १९९९ ते २०१४ या काळात राज्यातही राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची सत्ता होती. या काळात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये मतदारांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध राग व्यक्त केल्याचे दिसून आले होते. नागपूर जिल्ह्य़ातील रामटेक लोकसभा मतदारसंघात २००७ मध्ये पोटनिवडणूक झाली होती. शिवसेनेचे खासदार सुबोध मोहिते यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याने लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता व काँग्रेसने पुन्हा त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असूनही मोहिते यांना पराभूत व्हावे लागले होते.
पुणे जिल्ह्य़ातील खडकवासला येथील मनसेचे आमदार रमेश वांजळे यांचे अकाली निधन झाल्याने तेथे २०११ मध्ये पोटनिवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने वांजळे यांची पत्नी हर्षदा यांना उमेदवारी देऊन ही जागाजिंकण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावली होती. सत्तेत असूनही राष्ट्रवादीला ही जागा जिंकता आली नाही. उलट भाजपने ती पोटनिवडणूक जिंकली होती.
विधान परिषदेच्या नागपूर विभागात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सागर मेघे यांच्या राजीनाम्यामुळे २००८ मध्ये पोटनिवडणूक झाली. काँग्रेसची राज्यात सत्ता होती, स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतसंख्याही याच पक्षाकडे अधिक असताना ही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही. काँग्रेसचे अनंत घारड यांचा पराभव झाला होता. भाजपचे अशोक मानकर यांचा विजयी झाले होते. २००५ मध्ये दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचे आमदार गोंविदराव वंजारी यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे दीनानाथ पडोळे केवळ दोन हजार दोनशे मतांनी जिंकले होते. काँग्रेसच्या मतांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली होती. मध्य प्रदेश, पंजाब आणि अलीकडेच झालेल्या राजस्थानमधील पोटनिवडणुकीतही मतदारांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल दिला आहे हे येथे उल्लेखनीय.
पोटनिवडणुकींमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कौल देण्याची मतदारांची वरील पंरपरा लक्षात घेतली तर आगामी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक ही राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी अवघड जाण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे समाजातील सर्वच घटक नाराज आहे, ही नाराजी तो मतपेटीतून व्यक्त करू शकतो. दुसरीकडे काँग्रेसला ही नाराजी कशी मतपेटीत परिवर्तित करायची याच गणित जमायला हवे. तसे झाले तर भाजपच्या तोंडाला ही निवडणूक फेस आणू शकते. मात्र विकासाचा मुद्दा घेऊन भाजप या निवडणुकीत उतरणार असून याच आधारार सत्ताधाऱ्याविरोधातील नाराजीची धार कमी करण्याचा प्रयत्न राहील.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...