Wednesday 7 February 2018

खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग-डाॅ.बंग




गडचिरोली,दि.07ः- खेळ हा आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून आनंद मिळतो. शरीराला व्यायाम होतो. ज्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. पण, खेळातून घडणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्माण होणारे संघटन. या संघटनातूनच उद्याचे आदिवासी नेतृत्व पुढे येणार आहे आणि गावांचे प्रश्न सोडविणे ही या नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचे प्रतिपादन डॉ. अभय बंग यांनी केले.
धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च(शोधग्राम) येथे आज ६ फेब्रुवारीपासून आदिवासी युवा संसद कार्यक्रमांतर्गत डॉ. के. व्ही. चारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कबड्डी, व्हॉलिबॉल सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. राणी बंग, माजी आ. हिरामण वरखेडे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, आदिवासी युवक-युवतींना गणित, इंग्रजी हे विषय कठीण जात असतील पण त्यांना धावायला सांगितले तर ते एका पायावर तयार असतील. इथल्या निसर्गानेच त्यांना ही ताकद दिली आहे. ही ताकद वापरूनच खेळाची मैदाने गाजविण्याचा मूलमंत्र डॉ. बंग यांनी खेळाडूंना दिला.
डॉ. राणी बंग यांनी खेळामुळे आनंद, मैत्री निर्माण होते. सर्व आदिवासी बांधव एकत्र येतात. ही एकीच तुमची ताकद आहे. शासनाने वनहक्क गावांना बहाल केले आहे. यातून गावे आर्थिकरित्या समृद्ध होत आहेत. पण, या पैशाचा उपयोग गावाच्या, समाजाच्या विकासासाठी होणे आवश्यक आहे. जंगल वाचवणे ही आपली जबाबदारी आहे हे सांगतानाच तंबाखू, गुटखा, दारू या व्यसनांना जीवनातून कायम बाद करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. माजी आ. हिरामण वरखेडे यांनी खेळाच्या जुन्या आठवणी जागविल्या. खेळामध्ये जीवन जगण्याचे गमक आहे. ते आनंदाने अनुभवा, असे आवाहन युवा खेळाडूंना केले.
या क्रीडा स्पध्रेत गिरोला, रोंगावाही, भीमपूर, मकेर्गाव, भेंडीकन्हार, वाघभूमी, कोवानटोला, कुथेगाव या गावांदरम्यान व्हॉलिबॉल तर फुलबोडी, रेंगाटोला, माळदा, कुथेगाव, पवनी, कुपानेर या गावांदरम्यान युवक युवतींचे कबड्डीचे सामने रंगणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन नाजूक जाडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानेश्‍वर पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...