उमरेड,दि.१२- निवडणुकीचे काम आटोपून परतीच्या प्रवासात असताना उमरेड येथील दोन शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
नुकेश नारायण मेंढूले (३८) आणि पुंडलीक बापूराव बहे (५६) अशी अपघातातमृत्यू झालेल्या दोन्ही शिक्षकांची नावं आहेत. या भीषण अपघातात अन्य दोन शिक्षक देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उमरेड नागपूर महामार्गावर असलेल्या चांपा शिवारात शुक्रवारी ( १२ एप्रिल) पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अपघातात विजय बोहरूपी, रमेश पिपरे असे जखमी झालेल्या अन्य शिक्षकांची नावं आहेत.
शिक्षकांची निवडणूक मतदान कर्मचारी म्हणून हिंगणा विधानसभा क्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीचे कामकाज आटोपून चारही शिक्षक पहाटेच्या सुमारास एमएच १२ गीएफ ४५४७ या चारचाकी वाहनाने उमरेड येथे निघाले होते. रमेश पिपरे हे वाहन चालवत असताना वाहनाने एका झाडाला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की वाहनाचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. यामध्ये नुकेश मेंढुले हे जागीच ठार झाले तर पुंडलीक बहे यांचा सकाळच्या सुमारास मेडिकल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन शिक्षक जखमी झाले आहेत. अपघातातील दोन जखमी शिक्षकांना उपचारासाठी नागपूर मेडिकल येथे रवाना करण्यात आले आहे. नुकेश उमरेड येथील अशोक विद्यालयात कार्यरत होते तर पुंडलीक बहे हे कुही तालुक्यातील साळवा येथील खापर्डे विद्यालयात मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment