• 2337 विद्यार्थ्यांची
उपस्थिती
• 16900 चौरस फुटात साकारली रांगोळी
गोंदिया,दि.09 : जगातील सर्वात मोठी व
आदर्श लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते. भारतीय लोकशाही व्यवस्थेत निवडणूक
प्रक्रिया हा महाउत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. मतदार जागृती अभियानाच्या
माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. काल 8 एप्रिल रोजी गोंदिया
येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या
संकल्पनेतून 16900 चौरस फुट जागेत मतदार जागृतीसाठी महारांगोळी साकारण्यात आली. ही
रांगोळी साकारण्यासाठी विविध रंगांचा रांगोळी कलावंतांनी वापर केला.
महारांगोळीमध्ये गोंदिया जिल्ह्याचा
नकाशा तयार करुन त्यामध्ये भारतीय संसद, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन, दिव्यांग
मतदार तसेच महिला व शेतकरी मतदार साकारण्यात आले. जास्तीत जास्त दिव्यांग मतदाराला
प्रोत्साहित करण्यावर रांगोळीत भर देण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा
स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी देखील रांगोळी साकारण्यास आपला हातभार
लावला. रांगोळी काढण्यात आलेल्या परिसरात स्वाक्षरी अभियानाच्या फलकावर मी योग्य
उमेदवाराची निवड करणार, मी मतदानासाठी प्रलोभनाला
बळी पडणार नाही, यावेळी शंभर टक्के मतदान करणार अशाप्रकारे
विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देवून त्यावर स्वाक्षरी केली. तसेच विद्यार्थ्यांनी
आपल्या मनातील घोषवाक्य देखील या फलकावर लिहिली. यावेळी विविध रंगांचे फुगे आकाशात
सोडण्यात आली.
सुभाष बहुउद्देशीय संस्थेचे सुभाष मेश्राम त्यांच्या सहकलावंतांनी कलापथकाच्या माध्यमातून मतदानाबाबत मतदान जागृतीचा संदेश
दिला. महारांगोळी साकारण्यात कुलदिपीका बोरकर, प्रकाश भैरम, अरुण रामटेके, नागसेन
भालेराव, शिवलाल टांक, रसिकलाल वेगड, रश्मी बिसेन, अविनाश गोंदोळे, अरुण नशिने,
इरफान कुरेशी, विकास कोहाड, बालचंद राऊत, आदित्य अग्रवाल, यशोधरा सोनवाने,
स्नेलक्ष्मी साठवणे, आरती सतदेवे, जयश्री तरोणे, निर्मला नेवारे, स्नेहल
ब्राम्हणकर, शशिकला डोंगरवार, उषा नरुळे, मयुर गोहळ, योगिता येळणे, आकांक्षा मेनन,
कविता मेश्राम, किंजल परमार, तसेच माविमच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले.
मतदान जागृतीचा संदेश देणाऱ्या महारांगोळीच्या
कार्यक्रमाला विवेक मंदिर, श्री गुरुनानक शाळा, महावीर मारवाडी शाळा, एस.एस.गल्स
कॉलेज, एस.एस.गल्स स्कूल, मुन्सीपल कॉन्व्हेट, मनोहर मुन्सीपल हायस्कूल, मनोहर
मुन्सीपल हायर सेकंडरी स्कूल, राजस्थान कन्या विद्यालय, गुजराती नॅशनल स्कूल,
रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, सरस्वती महिला विद्यालय आणि जिल्हा परिषद कटंगी येथील
2338 विद्यार्थी आपल्या शाळेतून रॅलीद्वारे मतदार जागृतीचा संदेश देत
स्टेडियममध्ये पोहचले. महारांगोळीच्या सभोवताल उपस्थित विद्यार्थ्यांनी मानवी
शृंखला तयार केली होती.
जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी 18 वर्ष
पूर्ण झालेल्या व मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने मतदान करावे याचा आग्रह
धरला. जसे आपण दिवाळी व अन्य उत्सवाच्यावेळी रांगोळी काढतो तसे 11 एप्रिल हा
मतदानाचा दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावयाचा असल्यामुळे मतदान
जनजागृतीसाठी महारांगोळी काढल्याचे डॉ.बलकवडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी उल्हास नरड, गटशिक्षणाधिकारी एल.एम.मोहबंशी, गट समन्वयक विनोद पलोके, केंद्र प्रमुख बी.डी.डोंगरे, श्रीमती डी.बी.खोब्रागडे, कृष्णाओम फुन्ने, विजय ढोकणे, बाळकृष्ण बिसेन यांनी सहकार्य केले. सत्य साई संघटनेने कार्यक्रम स्थळी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन दिली होती. महारांगोळी साकारण्यासाठी गोंदिया येथील पंजाब नॅशनल बँकेने सीएसआरमधून निधी उपलब्ध करुन देवून शाखा व्यवस्थापक अमीत श्रीवास्तव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी मानले.
No comments:
Post a Comment