चंद्रपूर,दि.07ः- जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांत वाघाच्या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
यातील एक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील नवेगावमध्ये तर दुसरी घटना सिंदेवाही तालुक्यातील सावरगाव येथे घडली.ब्रम्हपुरी तालुक्यातील नवेगाव खुर्द (मेंडकी) येथील अनुसया मुरलीधर बनकर (६३) या गावातील इतर महिलांसोबत नेहमीप्रमाणे सकाळीच गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील नवेगाव एकाराच्या जंगलात मोहफुल गोळा करायला गेल्या होत्या. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. तिच्या नरडीचा घोट घेत तिला जागीच ठार मारले. त्यावेळी अगदी काही अंतरावर त्यांची बहीण व इतर महिला मोहफुल गोळा करीत होत्या. त्यांनी आरडाओरड करूनही त्याचा काही उपयोग झाला नाही.या परिसरात चार अवयस्क व दोन वयस्क वाघांचे वास्तव्य आहे. सदर घटनेप्रकरणी मृतकाच्या नातेवाइकांना २० हजार रुपये रोख दिले असून २ लाख ८० रुपयांचा धनादेश दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.दुसऱ्या एका घटनेत, सिंदेवाही तालुक्यातील सावरगाव येथील बाजीराव सोनुले (६०) हे मोहफुल वेचण्यासाठी गावानजीकच्या जंगलात गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या वाघाने बाजीराव यांच्यावर हल्ला करीत ठार केले. सदर घटना वनविकास महामंडळाच्या मरेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १३९ मध्ये घडली.
No comments:
Post a Comment