Thursday 4 April 2019

पळालेल्या पटोलेंची अमानत वाचविण्यासाठी धडपड-मुख्यमंत्री

गोंदिया,दि.04ः भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बुधवारला गोंदियात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील माजी खासदार नाना पटोलेंवर जोरदार टीका करीत येथून पळ काढून आमच्या नागपुरात आले आहेत. त्या पळपुट्या पटोलेंना नागपूरात आमच्या विकास कार्यासमोर आपली अमानत वाचविण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची बोचरी टीका केली. पटोलेंच्या नावानिशी मुख्यमंत्र्यानी जाहिर सभेत केलेला उल्लेखांने पुन्हा मतदारांमध्ये "हर हर मोदी, घर घर नाना" अशा सुर ऐकावयास मिळत होता.
पुढे बोलताना लोकसभा निवडणुकीच्या सुरवातीलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कप्तानाने माघार घेतली तर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणातून उपकप्तानाने माघार घेतली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली. ते म्हणाले धान उत्पादकांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे काम महाराष्ट्रतील भाजप सेना युती सरकारने अतिशय प्राणाणिकपणे केले आहे. नझुल पट्टेधारकांचा विषय असो की धानाला ५०० रुपये बोनस देण्याचे काम असो असे अनेक जनहिताचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. आघाडी शासनाच्या कारर्किदीत जेवढी धान खरेदी झाली नाही, त्याहून पाचपट अधिक धान खरेदी युती सरकारच्या काळात झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सिंचन घोटाळ्यावरील नावावर ते गप्प राहिले.
या सभेकरिता गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील गावागावातून बसेस व चारचाकी वाहनाने तसेच गर्दी कमी होऊ नये यासाठी शहरातील प्रत्येक वार्डात व्हीआयपी पासेस देऊन गर्दी जमविण्यात आली. त्यामुळे शहरातील बालगोपालांसह महिला पुरुषांची मोठी गर्दी होती. शहरातील रस्त्यावर वाहनामुळे खोळंबा निर्माण झालेला आहे. सभेसाठी आलेले माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार केशवराव मानकर,आमगावचे आमदार संजय पुरामसह अनेकांना सुरक्षेच्या नावावर देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेवटी आयोजकांनी पुढाकार घेतल्यानंतर या नेत्यांना मंचावरील स्टेजकडे आणण्यात आले. तर पोलिसांनी पासधारक पत्रकारांनाही अडवून त्यांना सभास्थळी जाण्यापासून रोखल्याचे समोर आले आहे.
या सभेसाठी सुमारे 6 हजार चारचाकी वाहनांचे नियोजन करण्यात आले होती, अशी माहिती उमेदवाराच्या जवळील एका व्यक्तीने दिली. प्रचार सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था योग्य पद्धतीने न करण्यात आल्यामुळे पतंगा मैदानापासून तर बालाघाट रस्त्यापर्यंत विविध ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांची पार्किंग अस्ताव्यस्त होती. बालाघाट, गोंदिया,भंडारा, पवनी,आमगाव, देवरी,वडसा,लांजी पासून लोकांना या सभेसाठी आणण्यात आले होते. प्रत्येक गावामध्ये 5 वाहने पाठविण्यात आली होती.
रस्त्यांवर गर्दी  होऊ नये, याकरिता शहरातील वाहनांसाठी, जिल्हा क्रीडा संकुल व मरारटोली येथील सामाजिक न्याय भवनाच्या बाजूला असलेल्या पटांगणात पार्कींगची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु क्रीडा संकुलात बोटावर मोजण्या इतकीच वाहने असताना बायपास रस्त्याच्या कडेलाच जागा मिळेल तेथे वाहने ठेवण्यात आली होती. कन्हारटोली,चौरागडे मेडीकल चौक परिसरात तिरोडा, तुमसर परिसरातील वाहने रस्त्यावर कुठेही उभी करण्यात आल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...