नागपूर,दि.04ः-कौशल्य विकास कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आलेला निधी देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच घेताना गडचिरोलीतील नेहरू युवा केंद्राच्या लेखापालासह दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी अटक केली. लेखापाल अखिलेश प्रसाद मिश्रा व त्यांचे सहायक बालाजी सहारे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू युवा केंद्र हे केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयांतर्गत येते. विविध कार्यक्रमांसाठी मंत्रालय निधी मंजूर करतो. तो युवा केंद्रामार्फत स्वयंसेवी संस्थांना देण्यात येतो. एका स्वयंसेवी संस्थेने मार्च महिन्यात महिलांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी स्वयंसेवी संस्थेला २६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी युवा केंद्राचे लेखापाल अखिलेश मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. निधी देण्यासाठी मिश्रा व सहारे यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली. पदाधिकाऱ्यांनी एवढी रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी पदाधिकाऱ्यांना सात हजार रुपयांची मागणी केली. सात हजार रुपये न दिल्यास निधी मंजूर न करण्याची धमकीही दिली. पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील सीबीआयकडे तक्रार दिली. सीबीआयचे अतिरिक्त अधीक्षक एस. डी. मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआयच्या पथकाने बुधवारी गडचिरोलीत सापळा रचला. सात हजारांची लाच घेताना दोघांना अटक केली. सीबीआयचे पथक त्यांच्या घराचीही झडती घेत आहेत. उशिरा रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती.
No comments:
Post a Comment