Tuesday, 16 April 2019

नागपुरात भाजप कार्यकर्त्यांत विजयाच्या आकडेवारीवरुन हाणामारी

नागपूर,दि.15 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान पार पडले.त्यानंतर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या नेत्याला विजय मिळेल की पराजय, या मुद्यावरून आकडेमोड करीत बसतात.तोच प्रकार नागपूर येथे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू असताना एकाने त्या सर्व चर्चेची मोबाईलमध्ये क्लीप तयार केल्याने शांततेतील प्रकरण मुद्यावरून गुद्यावर आले. त्यानंतर विलास करंगळे आणि त्यांच्या एका साथीदाराने आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचे घर गाठून त्याला आणि त्यांच्या बचावासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीलाही मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.या घटनेनंतर संबधिताने या प्रकरणाची हुडकेश्वर पोलिसांत तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अदखलपात्र अशी नोंद केली आहे.
लोकसभा निवडणुकीचा काय निकाल लागेल, यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी रात्री चर्चा सुरू होती. भाजपा शहराध्यक्ष, आमदार सुधाकर कोहळे यांचे खंदे समर्थकच नव्हे तर उजवा हात समजले जाणारे विलास करंगळे, विजय वानखेडे आणि अन्य काही त्या चर्चेत सहभागी झाले होते. भाजपा नेते नितीन गडकरी हे किती मतांनी निवडून येतील, यावर चर्चा सुरू असताना गडकरी ४० हजार मतांनी पराजित होतील, असे कुणीतरी यावेळी म्हटले.त्याच दरम्यान सुदाम वामनरावर सांगुळ (वय ५४ रा. उदयनगर) हे शूटिंग करीत असल्याचा संशय करंगळेंना आला. त्यामुळे करंगळेंनी सांगुळ यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यावरून त्यांच्यात चांगलाच वाद झाला. प्रकरण हाणामारीवर पोहोचल्याने उपस्थितांनी मध्यस्थी करून कशातरी प्रकारे वाद सोडवला. त्यानंतर सांगुळ त्यांच्या उदयनगरातील घरी निघून गेले. मध्यरात्री करंगळे आणि राणा सांगुळ यांच्या घरासमोर आले. त्यांनी सांगुळ यांना शिवीगाळ करीत घराबाहेर बोलाविले. ‘माझी मोबाईलमध्ये क्लीप का बनविली‘, अशी विचारणा करीत करंगळे आणि त्यांचा साथीदार राणा या दोघांनी सांगुळ यांना मारहाण केली. ते पाहून सांगुळ यांची पत्नी मदतीला धावली असता त्यांनाही दोघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे आजूबाजूची मंडळी गोळा झाल्याने करंगळे आणि साथीदार पळून गेले.
या घटनेमुळे उदयनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. सांगुळ यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी करंगळे आणि राणाविरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ठाणेदार संदीप भोसले यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...