Thursday 1 June 2017

परळीत बोगस ‘जलयुक्त’, 10 कोटींची थातूरमातूर कामे

EXCLUSIVE : पंकजांच्या परळीतच बोगस ‘जलयुक्त’, 10 कोटींची थातूरमातूर कामेअंबेजोगाई,दि.01 - बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत १५ कोटी रुपयांची कामे कागदोपत्री करण्यात आली असून यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील १० कोटींच्या बोगस कामांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
परळीतील हाळंब व खोडवा सावरगाव येथील ७ शेतकऱ्यांनी या कामांच्या चौकशीसाठी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी केवळ चौकशी समिती नेमण्याचा फार्स केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली. कृषी आयुक्तांनी कृषी विभागाचे उपसंचालक व्ही.एम. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली २० जणांचे चौकशी पथक मंगळवारी परळीतील चार गावांत पाठवले. पथकाने दिवसभर ८५ कामांपैकी ११ कामांची पाहणी केली. या पाहणीत काळ्या मातीऐवजी मुरूम-दगडाने काम करणे, अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न करणे असे प्रकार समोर आले आहेत. चार गावांत तर १० कोटींची कामे थातूरमातूर करून बिले उचलली आहेत. तीन लाखांचा माती नाला बांध २५ हजारांतच उरकला आहे.
पंकजा मुंडेंकडे जलसंधारण खाते असताना बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या १५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती. यात माती नाला बांध, खोल समतर चर, कंपार्टमेंट बिल्डींग अशी कामे करण्यात आली. पंकजांकडे बीडचे पालकमंत्रिपदही असल्यामुळे त्यांच्या परळी मतदार संघात १० कोटीची कामे करण्यात आली. 
ही कामे पंकजा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली कामे कामे वर्कऑर्डर प्रमाणे होतात का ? याची खातरजमाही केली नाही. माधव मुंडे, देवनाथ दहिफळे, मंचक गुट्टे, संदिपान गित्ते, केशव गुट्टे रा. हाळंब व खोडवा सावरगाव येथील बालासाहेब दहिफळे, सुधाकर दहिफळे या शेतकऱ्यांनी माहितीच्या अधिकारत सर्व तपशील मिळवून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे एप्रिल महिन्यात परळी तालुक्यातील हाळंब, हेळंब, खोडवा सावरगाव, धर्मापुरी गावात जलयुक्तच्या बोगस कामांची चौकशी करावी अशी मागणी केली होती. राम यांनी कागदोपत्रीच चौकशी समीती नियुक्त केली. हे पाहून शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे दाद मागितली. त्यांच्या आदेशाने चौकशी सुरू झाली असून पथकाने मंगळवारी दिवभर ८५ कामापैकी ११ कामाची पाहणी केली.

फौजदारी गुन्हे दाखल करा :जलयुक्त शिवार योजनेतंर्गत बीड जिल्ह्यात १५ कोटीची कामे बनावट झाली असून त्यात परळीतील १० कोटींची कामे आहेत. गैरव्यवहार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवा. अशी मागणी माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी केली आहे.
न्यायालयात दाद मागणार :परळीत जलयुक्तची कामे बोगस झाल्याची तक्रार कृषी आयुक्तांकडे केली होती.त्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने तक्रारीप्रमाणे अहवाल न दिल्यास आता न्यायालयात दाद मागणार आहेत, असे हाळंबचे तक्रारदार शेतकरी माधव मुंडे यांनी म्हटले आहे.

कंत्राटदारांकडून बडदास्त :कृषी आयुक्तांनी बीड जिल्हा पातळीवर नेमलेले चौकशी पथक परळी मतदार संघात मंगळवारी आले. त्यांनी कामाची पाहणी केली. परंतु या कामात ज्यांचे हात ओले झाले त्याच अधिकाऱ्यांना पथकाने सोबत आणले. त्यामुळे निपक्षपणे चौकशी कशी होणार असा सवाल तक्रादार देवनाथ दहिफळ यांनी केला आहे. चौकशी समितीची मंगळवारी रात्री परळीत एका कंत्राटदाराने चांगलीच बडदास्त ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला . 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...