Wednesday 21 June 2017

रुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा

बंगळूरच्या पोलिसावर कौतुकाचा वर्षाव
बंगळूर,दि.21(वृ्तसंस्था) - राजकीय नेते, मंत्री व अति महत्त्वाची व्यक्ती प्रवास करीत असेल तर त्या त्या भागातील वाहतूक थांबविली जात असतानाचे चित्र भारतीयांना नवीन नाही; पण बंगळूरमध्ये या उलट चित्र अनुभवायला मिळाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी (ता.१७) बंगळूरमध्ये होते. त्यांचा ताफा ट्रिनिटी सर्कल येथून जात असतानाच एक रुग्णवाहिका तेथे आली. तेव्हा तेथील पोलिसाने चक्क राष्ट्रपतींचा ताफा थांबवून तिला मार्ग खुला करून दिला.
पोलिस उपनिरीक्षक एम. एल. निजलिंगप्पा यांच्या या वेगळ्या प्रकारच्या धाडसाचे कौतुक शहरातून होत असून त्यांच्या प्रसंगावधानाची दखल सोशल मीडियावरही घेण्यात आली. बंगळूर पोलिसांनी निजलिंगप्पा यांची पाठ थोपटून बक्षीसही जाहीर केले. मेट्रोच्या ग्रीन लाइनचे उद्‌घाटन करण्यासाठी मुखर्जी शनिवारी बंगळूरमध्ये आले होते. राज भवनकडे जात असताना त्यांचा ताफा ट्रिनिटी सर्कल येथील वर्दळीच्या भागातून जात होता. त्या वेळी तेथून एचएएलजवळील खासगी रुग्णालयाकडे जाण्यासाठी वाट शोधणारी रुग्णवाहिका पाहून वाहतूक पोलिस उपनिरीक्षक निजलिंगप्पा यांनी तातडीने निर्णय घेत राष्ट्रपतींचा ताफा रोखला आणि रुग्णवाहिकेला रस्ता दिला. 
प्राधान्यक्रम ओळखून असा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकाऱ्याला बक्षीस दिले जाणार आहे. अशा चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन.
- प्रवीण सूद, पोलिस आयुक्त, बंगळूर

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...