Friday 9 June 2017

पर्यावरण रक्षणाचा संस्कार शाळांमधून घराघरात जावा- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ८ : राज्यात १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड होणार असून या कार्यक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणाचा संस्कार शाळांमधून घराघरात जावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.काल सह्याद्री अतिथीगृहात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक, सर्व उपसंचालक, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते.यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक श्री.भगवान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवडीत शिक्षण विभागाची भूमिका सर्वात महत्वाची असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वृक्ष लावणे हा केवळ शासकीय कार्यक्रम राहू नये. मिशन म्हणून सर्वांनी हे काम हाती घ्यावे. राज्यात ४ कोटी वृक्ष लावतांना प्रत्येकाच्या मनात वृक्ष लावण्याच्या इच्छेचे बीजारोपण झाले पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.
शाळा ही सर्वांच्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जीवन जगण्याचे धडे याच शाळांमधून दिले जातात. त्यामुळे वृक्ष लागवडीचा संदेश, वृक्षांचे महत्व शाळांमधून विद्यार्थ्यांना समजवून दिल्यास पर्यावरण रक्षणाच्या महत्वाच्या कामात ही उमलती पिढी फार लहानपणापासूनच सहभागी होईल. मागच्या पिढीने आपल्या हाती एक सुंदर धरा दिली आहे. आता वसुंधरेचे शोषण थांबवून पुढच्या पिढीच्या हाती एक चांगली पृथ्वी देण्याची जबाबदारी तुमची-माझी सर्वांचीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे वनाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी सर्वांनी वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी व्हावे तसेच वन आणि वनेतर जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, असे प्रतिपादन वन सचिव विकास खारगे यांनी केले. ते म्हणाले की, विद्यार्थी हे पर्यावरण रक्षणाचे सर्वात चांगले दूत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निर्माण होणारे
मनुष्यबळाचे सामर्थ्य खूप मोठे आहे. राज्यात ८८०० शाळांमध्ये इको क्लब स्थापन झाले आहेत. वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या कामात ही शक्ती मोठे योगदान देऊ शकते. यादृष्टीने प्रत्येक शाळेने १ जुलै ते ७ जुलै २०१७ दरम्यान होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची व्यापक जागृती करावी आणि हरित महाराष्ट्राच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे. राज्यात ३० लाख लोक हरित सेनेचे सदस्य झाले आहेत १५ ऑगस्ट २०१७ पर्यंत राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हरित सेनेत सहभागी होऊन नोंदणी करावी, त्यादृष्टीने शिक्षण संचालकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.शाळांच्या प्रत्येक बैठकीत, तपासणी कार्यक्रमात वृक्षांचे जतन आणि
संवर्धन हा विषय निकष स्वरूपात समाविष्ट करुन शाळेचे मूल्यमापन केले जावे, असेही श्री. खारगे यावेळी म्हणाले.
वृक्ष लागवडीसंदर्भात केलले सर्व काम वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावे अशा सूचना श्री. भगवान यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की,वन विभागाच्या सर्व जिल्हा कार्यालयात यासाठी आय.टी सेल स्थापन करण्यात आला आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या केलेल्या कामाची माहिती तिथे नेऊन दिल्यास ही माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याची कार्यवाही या सेलमार्फत केली जाईल.  नागपूर येथे लवकरच चोवीस तास कार्यरत राहणारी कंट्रोल रूम विकसित करण्यात येत असून त्याद्वारे वृक्ष लागवडीसंदर्भातील कोणत्याही शंकेचे निरसन किंवा येणाऱ्या अडचणीचे निराकरण केले जाईल, असेही ते म्हणाले.याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीसंदर्भात जनजागृती करणाऱ्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखविला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...