Friday 9 June 2017

विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन होणार प्रसारण ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ रविवारी

 

मुंबई, दि. ९ : राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देणाऱ्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाच्या ‘पाणी’ या विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी म्हणजे ११ जून २०१७ रोजी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता प्रसारण होणार आहे.
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित या कार्यक्रमाचे प्रसारण रविवारी ११ जून २०१७ रोजी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, झी २४ तास आणि साम टिव्ही या वाहिन्यांवरुन सकाळी १० वाजता होईल. याच कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवार दिनांक १२ जून २०१७ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन सायंकाळी ५.३० वाजता होईल. तर आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार दि. १२ जून आणि मंगळवार दि. १३ जून रोजी सकाळी ७.२५ वाजता होईल.
या कार्यक्रमात पाणीप्रश्नावर राज्यभरातील लोकांनी विचारलेल्या तसेच कार्यक्रमाच्या चित्रीकरणावेळी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली आहेत. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाआधी ई-मेल आणि एसएमएसवरुन लोकांकडून ‘पाणी’ या  विषयावर प्रश्न मागविण्यात आले होते. त्याला राज्याच्या विविध भागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साधारण १८ हजाराहून अधिक जणांनी यात सहभाग घेऊन पिण्याचे पाणी, जलयुक्त शिवार, शेततळे, राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचे प्रदूषण अशा विविध मुद्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले होते. यातील निवडक प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात उत्तरे दिली आहेत.
जलयुक्त शिवारची रखडलेली कामे केव्हा पूर्ण करणार, पाणी वापराच्या कायद्याचे काय, शेततळे कसे मिळेल, विदर्भात शिरपूर पॅटर्न का नाही,अर्धवट सिंचन  प्रकल्प पूर्ण कधी होणार, सोलापूर शहराला दररोज पाणी केव्हा मिळणार, डोंगराळ भागाला पिण्याचे पाणी कसे मिळेल, खारेपाट भागातील (पेण) पाणीटंचाई केव्हा संपणार, महाराष्ट्रातील नद्या जोडणार का, खटाव आणि माण भागातील पाण्याचे काय, अधिक पाणी पिणाऱ्या ऊसासाठी सुक्ष्मसिंचन केव्हा, प्रदुषीत पाण्याचे काय, गोसीखुर्द प्रकल्प केव्हा पूर्ण होणार,
अशा राज्याच्या विविध भागात जिव्हाळ्याच्या असलेल्या प्रश्नांबाबत राज्य शासन करीत असलेल्या व्यापक उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना या कार्यक्रमात दिली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...