Sunday 18 June 2017

सातव्या वेतन आयोगाची फूटपट्टी शेतकऱ्यांसाठी का नाही ?



नागपूर,दि.18 : कर्मचाऱ्यांसाठी सहावा, सातवा वेतन आयोग लागू केला जात आहे. आमचा या वेतन आयोगाला विरोध नाही. परंतु ८ तास काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या या वेतन आयोगाची फूटपट्टी १२ तास शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी का नाही, असा थेट प्रश्न शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थित केला. तसेच सातव्या वेतन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांनाही फूटपट्टी लावून त्यानुसार कृषीमूल्य आयोगाने भाव ठरवावे, असेही स्पष्ट केले.लोकशाही हक्क संरक्षण समितीच्यावतीने हिंदी मोरभवन येथील नटराज सभागृहात शनिवारी ‘शेतकरी आंदोलन : आव्हान आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेती विषयाचे अभ्यासक अमिताभ पावडे आणि अनंत भोयर प्रमुख अतिथी होते.
विजय जावंधिया म्हणाले, इंग्रजांनी आपल्या काळात येथील नागरिकांना गुलाम ठेवण्यासाठी असंघटित नोकरदार व असंघटित कामगार, शेतकरी यांचे वेतन निश्चित करण्यासाठी एक पद्धत अवलंबिली होती. ती पद्धत आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही कायम आहे, असे का? शेतकऱ्यांचे प्रश्न हे या देशातील चुकीच्या आर्थिक धोरणांमध्ये लपलेले आहे. १९९० नंतर राबवण्यात आलेल्या आर्थिक धोरणामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठे नुकसान सोसावे लागले आहे. या चुकीच्या धोरणांविरुद्ध आपण आवाज उठवणार की नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायचे असतील तर त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अमिताभ पावडे म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण कसे होते, हे येथील राजकारण्यांनी सोप्या शब्दात शेतकऱ्यांना कधी समजावून सांगितलेलेच नाही. शाळांमधून शेती शिकवली जात नाही. शेतीचे अर्थशास्त्र सांगितले जात नाही. असे का? कारण ज्या क्षेत्रातील लोकांना गुलाम करायचे असते, त्या क्षेत्राबाबत लोकांना अज्ञानी ठेवले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.अनंत भोयर यांनी सोप्या शब्दात शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कांदा हा २० रुपये किलोने विकला जातो. तेव्हा आयात करून त्याचे भाव पाडले जातात. परंतु तोच कांदा जेव्हा ५ रुपयाला विकला जातो तेव्हा निर्यात का केली जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.प्रास्ताविक व संचालन प्रज्ज्वला तट्टे यांनी केले. सुनील दुधे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...