Monday 19 June 2017

रामनाथ कोविद एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार



नवी दिल्ली,दि.१९-राष्ट्रपतीपदासाठी भाजप प्रणित एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामनाथ कोविंद सध्या बिहारचे राज्यपाल आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले. भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एनडीएच्या सर्व घटकपक्षांना ही माहिती देण्यात आल्याचे अमित शहा यांनी सांगितले आहे. रामनाथ कोविंद 23 जूनला उमेदवारी अर्ज भरतील.
‘रामनाथ कोविंद मूळ उत्तप्रदेशमधील कानपूरचे असून दलित प्रवर्गातले आहेत. संघर्ष करुन रामनाथ कोविंद आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. रामनाथ कोविंद 12 वर्ष राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशचे महासचिवदेखील होते’. अशी माहिती अमित शहा यांनी दिली आहे.
‘नाव ठरण्याआधी आम्ही देशातील सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. नाव ठरल्यानंतर एनडीएतील सर्व घटकपक्षांना कळवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याशी बातचीत करत नाव कळवल्याची माहिती अमित शहा यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही नाव कळवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी नाव ठरल्यावर कळवू असे अमित शहा भेटीत सांगितले होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि स्वामीनाथन यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात हे पहावे लागेल.
राष्ट्रपतीपदासाठी भाजपा नेमकी कोणाला उमेदवारी देते यावरुन अखेर अमित शहांनी पडदा उचलला. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा सुरु होती. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचंही नाव चर्चेत होते. भाजपा त्यांना उमेदवारी देईल असा अंदाज होता.
भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण, या हालचालींना सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात वेग आला असतांना, लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वात उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार असल्याचे पोस्टर्स रविवारी अचानक भाजपचे मुख्यालय असलेल्या अशोका रोडवर, संसदेकडे जाणाऱ्या रायसीना मार्गासह अनेक ठिकाणी झळकले होते. तथापि मुख्यालयाच्या भिंतीवर लागलेले हे पोस्टर्स काही तासातच फाडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली.
राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणींचे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. जोडीला मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांची नावेही चर्चिली गेली. राजधानीच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा विषय केंद्रस्थानी असतांना, अचानक अडवाणींच्या नावाचे समर्थन करणारे पोस्टर्स रविवारी झळकले. पोस्टर्सवरील मजकूरात‘भारतीय जनता पक्षाचे जनक, लोहपुरूष तथा भारताच्या राष्ट्रीय राजकारणातले आदरणीय नेते लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वाधिक उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार आहेत’ असा उल्लेख होती. सुषमा स्वराज यांनीदेखील आपण स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...